नवरात्रोत्सव काळात महालक्ष्मी मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून, देवीला देण्यात येणाऱ्या सहावारी साडय़ांबाबत तक्रार आल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने परिसरातील व्यापाऱ्यांना देण्यात आला.
शारदीय नवरात्रोत्सव काळात करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून लाखो भाविक येतात. नवरात्रीच्या काळात अंदाजे १० लाखांहून अधिक भाविक देवीचे दर्शन घेतात. या काळात मंदिर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनेही मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांना उत्सव काळात प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. या काळात व्यापाऱ्यांनी केवळ कापड पिशव्या वापराव्यात, व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर अतिक्रमण करू नये, तसेच देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या सहावारी साडय़ांमध्ये जर भाविकांकडून काही तक्रारी आल्या, तर संबंधित व्यापाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा