शासनाच्या ताब्यात असणारे केशवराव भोसले नाटय़गृह आपल्या माहेरी होते. पण तुमच्या मागणीप्रमाणे ते ताब्यात दिले आहे, म्हणजेच सासरी पाठवले आहे. पान, तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी त्याचा अवमान करु नका, तर सासरी आलेल्या सुनेप्रमाणे हे नाटय़गृह सांभाळा, स्वच्छ ठेवा. शासनाकडे सततच्या हुंडय़ाप्रमाणे मागण्या टाळा, असे आवाहन अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रेक्षक़ांना केले. केशवराव भोसले नाटय़गृह उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
ढोल-ताशे घेऊन पारंपरिक वेशातील शिपाई माय बाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी सज्ज होते. नाटय़गृहाचे मुख्य सभागृह सजले होते. रंगमंचासमोर  प्रेक्षकांना नाटय़गृहाचा पडदा उघडून त्याचे देखणे रुपडे पाहण्याची आस लागली होती. अशातच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी फीत कापली आणि केशवराव भोसले नाटय़गृहाचा पडदा उघडला.
अभिनेते नाना पाटेकर यांनी,‘‘ इथे मी माझ्या भाकरीचा तुकडा खूप वेळा मोडला आहे. या रंगमंचावर माझा िपड पोसला आहे,’’ अशा शब्दात आपल्या भाषणाची सुरुवात करून संपूर्ण सभागृहाचे वातावरण भारावून टाकले. सामान्यांनी एक एक पाऊल उचलत आज या रंगमंचावर तब्बल १० लाखाची मदत ‘नाम‘ फौंडेशनला दिली आहे. ही मी, माझ्या संस्थेने जनतेची मिळवलेली विश्वासार्हता आहे, जी राजकारण्यांनो तुम्ही आज गमावून बसला आहात, अशा शेलक्या शद्बांत पाटेकर यांनी राजकारण्यांचा खरपूस समाचार घेतला.
आमदार सतेज पाटील म्हणाले, की केशवराव भोसले नाटय़गृहासाठी टप्प्यातील १० कोटीचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. कलाकारांच्या निवासाची सोय, संगीतसूर्याचा पुतळा अशी काही कामे होणे गरजेचे आहे. हे आव्हान आता आघाडी सरकारकडे आहे, असे सांगून सर्व आमदार आपला महिन्याचा पगार नाम फौंडेशनसाठी देतील, असे जाहीर केले.
मुश्रीफ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जमणारा सर्व निधी आणि स्वत:चा काही निधी असे ११ लाख रुपये ‘नाम’ फौंडेशनला देणार असल्याचे जाहीर केले.
केशवरावसाठी १४ कोटींचा निधी- पालकमंत्री
नाटय़गृहाचे काम पूर्ण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. सुर्वेनगर, कळंबा या उपनगरांत आणखी एखादे नाटय़गृह उभारण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. केशवरावच्या उर्वरित कामासाठी जुलैमध्ये १४ कोटींचा निधी आणण्याचेही त्यांनी जाहीर केले.

Story img Loader