कोल्हापूर : नानाविध प्रकारचे कर्णकर्कश्य आवाज करून दुचाकी दामटणाऱ्यांना कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने बुधवारी चांगलाच दणका दिला. अशा १३२ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचे सायलेन्सर जप्त केले आहेत. त्यांच्याकडून १ लाख ३२ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे
शहरात सायलेन्सर बदलून वाहने चालवण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वेगळ्या आवाजाचे चित्र विचित्र आवाजाचे सायलेन्सर दुचाकीला बसवले जातात. त्यासाठी मोठी रक्कम खर्च केली जाते. गर्दीच्या ठिकाणी अशा सायलेन्समधून अनेकदा भीतीदायक वाटणारे आवाज काढले जातात. परिणामी अन्य वाहनधारक, पादचारी, नागरिकांना याचा उपद्रव होत असतो. यावर कारवाई करण्याची मागणी होत होती.
हेही वाचा >>> कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक पोहचले थेट इटलीत; राजाराम महाराजांच्या समाधीसमोर झाले नतमस्तक
त्याची दखल घेऊन कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने बदललेल्या सायलेन्सर वाहनधारकांना रस्त्यावर अडवले. १३३ बदललेल्या सायलेन्सर वाहनावर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ३२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
जप्त सायलेन्सर चिरडणार वाहनाच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून त्याचा नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा सायलेन्सर जप्तीची कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली. दरम्यान जप्त केलेले सायलेन्सर हे बुलडोझर खाली चिरडले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.