कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील प्राथमिक सेवा संस्थेला कर्जपुरवठा दाखला देणार नसाल तर बुधवारी दुपारी तीन वाजता जिल्हा कोल्हापूर जिल्हा बँकेसमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा बँकेसमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस छावणीचे स्वरूप परिसराला मिळाले आहे.
शिरोळ तालुक्यातील अक्किवाट येथील नियोजित विमलनाथ चौगुले सेवा सोसायटीला कर्जपुरवठा करण्यासाठी जिल्हा बँकेने दाखला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र हा दाखला देण्यास जिल्हा बँकेने टाळाटाळ सुरू केली आहे. याबाबत राजू शेट्टी यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांची भेट घेऊन जाब विचारला होता.
हेही वाचा… Maharashtra News Live : IRS अधिकारी सचिन सावंत यांना ईडीकडून अटक, लखनऊहून मुंबईला आणणार
आमच्या सोसायटीला कर्जपुरवठा करणार नसेल तर राहू दे; पण गेल्या सहा महिन्यात किती सेवा संस्थांना अपेक्षित कर्जपुरवठ्याचा दाखला दिला आहे याची माहिती दिली जावी, असा मुद्दा शेट्टी यांनी लावून धरला होता. तर बँकेचे संचालक शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील हे राजकारण करीत असल्याने दाखला देण्यास अडथळा निर्माण करत आहेत. त्यांचा सहकारी संस्था मोडीत काढण्याचा इतिहास आहे ,अशी टीका केली होती. बँकेने दाखला दिला नाही तर आज हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल बँक व प्रशासनाने घेतली असून रात्रभर यंत्रणा गतिमान झाली आहे.
हेही वाचा.. कोल्हापूर: के. चंद्रशेखर राव इतकी उधळपट्टी कशी करतात? राजू शेट्टी यांची विचारणा
कोल्हापूर पोलिसांनी रात्री उशिरा जिल्हा बॅंक येथे बेमुदत आंदोलन करीत असलेल्या उपोषणकर्त्यांना ताब्यात घेऊन मार्केट यार्ड याठिकाणी ठेवले आहे. रात्री २ वाजता जिल्हाधिकारी व जिल्हापोलिसप्रमुख यांनी दुरध्वनी वरून संपर्क साधला. आज जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बॅंकेचे पदाधिकारी यांचेसोबत बैठक आयोजित केली आहे.सदर बैठकीस राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी ऊपस्थित राहणार आहेत.