दयानंद लिपारे
मुख्यमंत्र्यांपाठोपाठ मोहन भागवत, अजित पवार, सोनल पटेल, राजू शेट्टी यांचे कार्यक्रम
जनता शिलंगणाचे सोने लुटल्यानंतर दिवाळी सणाच्या तयारीत असताना राजकीय नेत्यांना मात्र आता निवडणुकांचे वेध लागले आहेत. कोल्हापुरात तर यंदाच्या दिवाळीत खऱ्या फटाक्यांपेक्षा राजकीय फटाकेच मोठय़ा प्रमाणात फुटण्याची शक्यता अधिक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या आजच्या शेतकरी परिषदेनंतर पुढच्या संबंध आठवडय़ात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, खासदार राजू शेट्टी यांची ऊस परिषद आणि किसान सभेचे शेतकरी आंदोलन अशा एका पाठोपाठ एक राजकीय बार फुटणार आहेत.
लोकसभा-विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. निवडणुकीच्या तयारीला सारे पक्ष लागले आहेत. एकेक दिवस महत्त्वाचा ठरत आहे. यामुळेच यंदा दिवाळी सण तोंडावर आला असताना राजकीय पक्षांना सणांपेक्षा निवडणूक तयारी अधिक महत्त्वाची वाटत आहे. त्याची प्रचिती कोल्हापुरात येत आहे. सर्वच राजकीय पक्ष, संघटनांनी दणकेबाज कार्यक्रमांचे आयोजन करून प्रतिस्पध्र्यांना धडकी भरवण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
कोल्हापूर हा मुळातच पुरोगामी आणि राजकीयदृष्टय़ा संवेदनशील जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. दरडोई उत्पन्नात राज्यात अग्रेसर असणाऱ्या कोल्हापुरातील घडामोडींकडे अवघ्या राज्याचे लक्ष वेधलेले असते. दिवाळी सुरू होईपर्यंत जिल्यात राजकीय धुळवड पाहायला मिळणार आहे. या आठवडय़ात जिल्याच्या अनेक भागात विविध कार्यक्रमातून राजकीय नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. मंगळवारी कोल्हापुरात काँग्रेसच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीचे वस्त्रहरण केले. दोन दिवसीय शिबिराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी रिचार्ज केले जात आहे.
कणेरी येथील सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये मेंदूविकारातील न्युरोनेव्हिशेन प्रणालीचा लोकार्पण सोहळा गुरुवारी रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम अराजकीय असला, तरी त्याला काही राजकीय परिणाम आहेत.
या कार्यक्रमाचे संयोजक सिद्धगिरी मठाचे प.पू.काडसिद्धेश्वर स्वामी यांचे नाव कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने घेतले जात आहे. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांंचा या कार्यक्रमाकडे ओढा राहणार आहे .
उसाचा फड पेटणार
ऊस दराचा प्रश्ना प्रत्येक वर्षी बहूचर्चित ठरत असतो. मंत्री खोत यांनी यासाठी बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऊस परिषद घेतली. तर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांची ऊस परिषद शनिवारी जयसिंगपूर येथे होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही शेतकरी नेत्यांच्या ऊस परिषदा महत्त्वाच्या आहेत. शेट्टी काय भूमिका मांडतात, ऊस दरासंबंधी आंदोलनाची कशी घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
शनिवारी कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांचा एल्गार मेळाव्याला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधपक्ष नेते धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर, २ नोव्हेंबरला अखिल भारतीय किसान सभेचे शेतकरी आंदोलन होणार असून उसाला प्रतिटन ३५०० रुपये मिळावेत अशी मागणी होणार आहे. यामुळे थंडीची चाहूल लागली असताना राजकीय वातावरण मात्र गरम होत असल्याचा अनुभव कोल्हापूरकरांना येत आहे.