गतवर्षी नववर्षाचा पहिला दिवस उजाडतानाच महाडिकांच्या बंगल्यात बिबटय़ा घुसल्याने त्याची भयचकित चर्चा झाली असताना वर्षाखेरीस महाडिकांच्या घराण्यातील वाघ समजल्या जाणाऱ्या महादेवराव महाडिक यांची विधानपरिषद निवडणुकीत राजकीय शिकार झाली. या पराभवामुळे राजकारणात मातब्बर म्हणून म्हणवले जाणारे महाडिक कुटुंबीय घायाळ झाले. सरसेनापतीचीच राजकीय सद्दी संपल्याने कुटुंबातील खासदारकी व आमदारकीच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असलेल्या महाडिक कुटुंबाने गत तीन दशकांत कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय, सहकार क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले. गेली १८ वष्रे विधानपरिषदेवर निवडून येणाऱ्या महादेवराव महाडिक यांनी महापालिका, गोकुळ दूध संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा कृषी उत्पन्न समिती अशा प्रमुख संस्थांवर आपल्या शब्दाची हुकमत ठेवली. शिवाय पुतण्या धनंजय यास राष्ट्रवादीतून खासदार तर पुत्र अमल यास भाजपकडून आमदार बनविण्यात ते यशस्वी ठरले. सून शौमिका यांना जिल्हा परिषद सदस्य बनविण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. मावळत्या वर्षाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील सर्वात ताकदवान घराणे म्हणून महाडिक यांचा लौकिक बनला होता.
वर्ष संपताना मात्र महाडिकांच्या राजकीय अस्तित्वाला दोन जबर तडे गेले. महापालिका निवडणुकीत भाजपशी संग करूनही महाडिकांच्या ताराराणी आघाडीला अपयशाला सामोरे जावे लागले. महापालिका निवडणुकीतील राजकारणाचा परिपाक म्हणून महाडिक यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारताना पक्षातून निलंबित करण्याची कठोर कारवाई केली. विधान परिषद निवडणुकीत भाजपचा पाठिंबा असला तरी महाडिकांची झुंज एकाकीच होती. या निवडणुकीत त्यांना एकेकाळचा राजकीय चेला असलेल्या सतेज पाटील यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. मात्र एकाकी लढत देतानाही महाडिक यांनी विरोधी गोटातील मते फोडून एका अर्थाने विरोधकांनाही शह दिला.
विधानपरिषद निवडणुकीतील महादेवराव महाडिक यांच्या अपयशाने महाडिक कुटुंबाच्या एकूणच राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कुटुंबाचा राजकीय कणा असलेल्या महादेवरावांच्या भाळी असलेला आमदारकीचा टिळा पुसला गेला असल्याने त्यांचे राजकीय वजन कमी झाले आहे. इतकेच नव्हेतर विरोधकांनी आता लोकसभा, विधानसभा निवडणुकीतून महाडिक कुटुंबातील पदे हिसकावून घेण्याची व्यूहरचना आतापासूनच मांडली आहे. विरोधकांच्या हल्ल्याला पुरून उरण्यासाठी महाडिकांनी राजकीय बांधणी नव्याने करणे अपेक्षित असून, कोत्या वृत्तीच्या सल्लागारांना दूर करून निष्ठावंत कार्यकर्त्यांना साथ दिल्यास राजकीयदृष्टय़ा त्यांना उभारणी व उभारी घेणे शक्य होणार आहे.