विघ्नहर्त्या गणरायाच्या साक्षीने करवीरनगरीत राजकीय संघर्षाचे फटाके फुटू लागले आहेत. भाजपचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ तसेच आमदार महादेवराव महाडिक आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये राजकीय जुगलबंदी सुरू झाली आहे. गणेशोत्सवातील देखाव्यापेक्षा राजकीय मेळ्यातील शेरेबाजीच अधिकचे मनोरंजन करू लागली असल्याने करवीरकरांना शेलक्या मनोरंजनाचा आनंद चाखायला मिळत आहे.
शहरातील कोणताही मोठा सांस्कृतिक उत्सव राजकीय पाठबळाअभावी पार पडत नाही. खासदार धनंजय महाडिक आयोजित भव्य दहीहंडी स्पध्रेच्या वेळीही राजकीय फटकेबाजी बरोबरच नाराजीचे दर्शनही घडले होते. पाठोपाठ शिवाजी चौकातील २१ फुटी महागणपतीच्या आरतीवेळी राजकीय महावादाचे दर्शन घडले. धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी शेरेबाजी टाळावी, अशी अपेक्षा असली तरी ती फोल ठरुन राजकीय फटाके फुटले.
काँग्रेसचे विधान परिषद सदस्य महादेवराव महाडिक यांनी आपले प्रतिस्पर्धी सतेज पाटील यांना टीकेचे लक्ष्य केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर महाडिक यांनी गोकूळ दूध संघाच्या वेळी उपस्थित केलेल्या आरोपांची उजळणी करीत पाटील कुटुंबीयांनी शहरातील मोक्याच्या जागा काबीज करून संपत्ती उभारल्याचा आरोप केला. सतेज पाटील हे मंत्रिपदी असताना औषध दुकानदारांकडूनही हप्ते गोळा करीत असल्याचा आरोप करुन महाडीक यांनी खळबळ उडवून दिली.
पाठोपाठ सतेज पाटील यांनीही महाडीक यांना पेट्रोल भेसळीतील राजन शिंदे याच्याशी असलेले संबंध आणि माधवराव रामचंद्र महाडीक यांच्या घरातील मटका अड्डय़ावर पोलिसांनी टाकलेला छापा याचे स्पष्टीकरण महागणपतीसमोर येऊन करावे, असे प्रतिआव्हान दिले. महाडिक घराणे सत्तेचे दिवाने असल्याने काकांनी काँग्रेसला आणि पुतण्याने राष्ट्रवादीला टांग लावली असल्याचे सांगत पाटील यांनी महाडीकांच्या राजकीय निष्ठेचे वाभाडे काढले.
दुसरीकडे महागणपतीच्या मंचावरून सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. सहकारात गैरव्यवहार करणा-यांची गय केली जाणार नाही.  जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी सुरू असून सुनावणीनंतर संचालकांना घरी बसावे लागेल, असे सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केले होते. सहकार मंत्र्यांचा निशाणा मुश्रीफांच्या वर्मी बसला. त्यावर मुश्रीफांनी सहकार मंत्र्यांच्या कायदेशीर ज्ञानाबद्दल शंका उपस्थित करत ते राजकीय सूडनाटय़ात वेळ घालवत असून मंत्रिपदाच्या मूळ जबाबदारीपासून बाजूला गेल्याची टीका केली. जिल्हा बँकेबाबत माझ्यावर जशी कारवाई होईल तशी पालकमंत्र्यांच्या शेजारी बसलेल्या महाडिकांवरही होईल, असे सांगत या चौकशीत सहकारमंत्र्यांना तारतम्याने निर्णय घ्यावा लागेल, अशी मार्मिक टिप्पणी केली. अद्याप गणेशोत्सव संपण्यास कालावधी असून राजकीय फटाक्याची माळ किती फुटत राहते, हे आता लक्षवेधी बनले आहे.

Story img Loader