दयानंद लिपारे, लोकसत्ता
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सतेज पाटील विरुद्ध महाडिक परिवार असा सत्तासंघर्ष रंगला आहे. एकेकाळी जिल्ह्यातील सर्व संस्थांवर प्रभुत्व असणारे महाडिक यांनी गृह राज्यमंत्री असतानाही सतेज पाटील यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत केले. तेव्हापासून सत्तासंघर्षांला अधिकच जोर चढला. पुढे राजकीय वाऱ्याने दिशा बदलली ती पाटील यांच्या दिशेने सतेज वाहू लागली. गेल्या पाच-सहा वर्षांच्या कालावधीतच महाडिक यांच्यावर सातत्याने मात करीत पाटील यांनी ‘विजया- दशमी’ साजरी केली आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे कडवे आव्हान परतवून लावत हात निवडून आणल्याने विजयाची नोंद काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे.
कोल्हापुरात गेल्या २० वर्षांमध्ये सतेज पाटील विरुद्ध महाडिक परिवार असा राजकीय संग्राम सुरू आहे. यापूर्वी जिल्ह्याने असा संघर्ष रत्नाप्पाण्णा कुंभार विरुद्ध जिल्ह्यातील अन्य नेते तसेच दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक – हसन मुश्रीफ असा पाहिला होता. त्यानंतर त्याच तोडीचा संघर्ष पाटील – महाडिक कुटुंबात रंगला.
माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे एकेकाळी जिल्ह्याची सर्व सत्तासूत्रे एकवटलेली होती. त्यांच्यासोबतच सतेज पाटील यांनी राजकीय प्रवास सुरू केला. तेव्हा धनंजय महाडिक हे त्यांचे मित्र होते. शिवसेनेकडून पहिल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पुढे धनंजय महाडिक राष्ट्रवादीकडून निवडून आले. तेव्हा पाटील यांनी मित्र कर्तव्य पार पाडत त्यांना मदत केली होती. मात्र पाटील यांनी मदत केली नाही, असा आरोप करून महाडिक यांनी पाटील यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीला मोहीम उघडली. महादेवराव महाडिक यांचे पुत्र अमल विधानसभेत पाटील यांचा पराभव करून निवडून आले.
विधानसभा निवडणुकीतील पराभव सतेज पाटील यांना जिव्हारी लागला. तेव्हापासून त्यांनी महाडिक यांना नामोहरम करण्याचा जणू विडाच उचलला. त्याची सुरुवात नोव्हेंबर २०१५ मध्ये कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता मिळवून केली. पुढच्याच दोन महिन्यात विधान परिषद निवडणुकीत महादेवराव महाडिक यांना पराभूत करण्याची किमया पाटील यांनी केली. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेचे संजय मंडलिक यांना ‘आमचं ठरलंय’ हे घोषवाक्य घेऊन पूर्णत: मदत केली. या लढतीत धनंजय यांचा पराभव करण्यामागे पाटील यांची यंत्रणा प्रभावी ठरली. लगेचच विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तरमधून चंद्रकांत जाधव, तर दक्षिणमधून पुतण्या ऋतुराज पाटील यांना निवडून आणण्यामागे सतेजनीती यशस्वी ठरली. जिल्हा परिषदेत महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका यांच्या रूपाने अध्यक्षपद प्रथमच भाजपकडे गेले. काँग्रेसचे सत्तास्थान हातून निसटले. तथापि, अध्यक्षपदाची अडीच वर्षांनंतर अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर काँग्रेसचा अध्यक्ष करून पाटील यांनी राजकीय दबदबा दाखवून दिला. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवेळी नवख्या प्रा. जयंत आसगावकर यांच्या विजयात पाटील यांचा मोलाचा वाटा राहिला.
महाडिक मूळचे सोलापूर जिल्ह्यातील. पण कृष्णा – पंचगंगा काठी त्यांनी आपली मिरासदारी राखली; त्यामागे प्रामुख्याने गोकुळ दूध संघावरील निर्विवाद वर्चस्व आणि त्यातून मिळणारी रसद कारणीभूत ठरत होती. गोकुळमधील त्यांच्या सत्तेला भेदण्यासाठी सतेज पाटील यांनी प्रयत्न केले. पहिल्या निवडणुकीत त्यांना थोडय़ा मतांनी पराभूत व्हावे लागले. करोना संसर्ग असतानाही झालेल्या निवडणुकीत पाटील यांनी महाडिक यांची सत्तेची हंडी फोडून जोरदार धक्का दिला. तर राष्ट्रवादीचे नेते, ग्रामविकास मंत्री यांच्या सोबतीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सत्ता कायम राखली. यानंतर आता कोल्हापूर पोटनिवडणुकीत महाडिक यांचे भाचे सत्यजित कदम यांना पराभूत करून त्यांनी विजयाचे पुढचे पाऊल टाकले.
महाडिक यांना सलग नमावण्याची किमया करणारे सतेज पाटील यांचे राज्याच्या काँग्रेस सत्तावर्तुळात महत्त्व वाढीस लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार , काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आदींसह प्रियंका गांधी यांनीही पाटील यांच्या पाठीवर शाबासकी दिली आहे. या विजयाने पाटील यांना राज्यमंत्री वरून कॅबिनेट बढतीची संधीही निर्माण झाली आहे.
सामना पुढेही सुरूच
उत्तर पोटनिवडणुकीमध्ये सतेज पाटील यांनी नियोजनबद्ध सूत्रे हलवल्यामुळे जयश्री जाधव यांचा विजय सुकर झाला. महाडिक परिवाराला हा आणखी एक धक्का असला तरी या निवडणुकीत भाजपनेही मतांमध्ये दुप्पट वाढ केली असल्याने हा गट पुढील काळातही पाटील यांना आव्हान देण्यासाठी सरसावला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या नळ पाणी योजनेवरून सत्यजित कदम यांनी नव्याने प्रश्न उपस्थित करीत बुधवारी पाटील यांना लगेचच आव्हान दिले आहे. यामुळे यापुढे कोल्हापूर महापालिका, लोकसभा, कोल्हापूर दक्षिण -उत्तर निवडणूक येथे पाटील -महाडिक यांच्यातील सामन्याच्या पुढच्या फेऱ्या सुरू राहतील असे स्पष्टपणे दिसत आहे. नव्या मुकाबल्यात कोण बाजी मारणार यावर जिल्ह्याच्या राजकारणात कोणाचे वर्चस्व आहे हे स्पष्ट होणार आहे.