कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील हे भरवशी कारभार आज वेशीवर टांगला गेला. रुग्णालयातील तीन कर्मचारी गेल्या एक-दीड महिन्यापासून विनाकारण सुट्टीवर आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल आणि जे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी दिला.
सफाई कर्मचाऱ्यांनी १४५०० हजार पगार मंजूर असताना हातात ८५०० रुपये मिळतो, तोही वेळेत मिळत नाही, हा पूर्ण १४५०० रुपये पगार मिळालाच पाहिजे, अशी मागणी यावेळी केली.यावेळी कृष्णा पाटील म्हणाले, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये जबाबदार पणे काम सुरू आहे का, याची मी स्वतः सामान्य नागरिकाच्या माध्यमातून अनुभूती घेतली आहे. त्यामुळे यापुढे जे कर्मचारी प्रामाणिक काम करतील त्यांचा सन्मान करून जे काम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये यापुढे दर्जेदार सेवा देऊ असा निर्धार येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
आणखी वाचा-गुंड शाम लाखे याची खंडणीसाठी चार मुलांना मारहाण; थरकाप उडवणाऱ्या व्हिडिओने खळबळ
महापालिका हॉस्पिटलच्या माध्यमातून दर्जेदार भक्कम सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये भोंगळ कारभार सुरू असल्याचे समजताच दोन दिवसापूर्वी झाडाझडती घेण्यात आली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने आज कर्मचाऱ्यांचे बरोबर बैठक नियोजित केली होती. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल प्रमुख डॉक्टर संजना बागडी यांनी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याबरोबरच हॉस्पिटल भक्कम होण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी आश्वासन दिले.
आणखी वाचा-‘बिद्री’च्या सभासदांचा मोर्चा; आमदार आबिटकर यांच्या विरोधात घोषणाबाजी
हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी योग्यरीत्या बोलून त्यांना मदत करावी असे आवाहन शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख पूजा शिंदे यांनी यावेळी केले. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करवीर तालुकाप्रमुख मोहन खोत व शहर समन्वयक विनायक जरांडे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना योग्य सुविधा पुरवण्यासाठी सर्वांचे प्रश्नही जाणून घेतले. रुग्णालयातील सर्व विभागात पाहणी करून योग्य सुविधा मिळवण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जसे की रुग्णालयातील इमारतीचे काम, सुरक्षारक्षक, पोलीस चौकीची गरज, स्वच्छतेबाबतचे प्रश्न, मशनरी साठीची व्यवस्था इत्यादी बाबत महानगरपालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधून कामे लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे यावेळी साळुंखे यांनी सांगितले. यानंतर त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची चौकशी करून त्यांचा अनुभव जाणून घेतला.
रुग्णालयातील स्टाफने त्यांच्या सर्व समस्या मांडताना आज आम्हाला आमच्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाले याचे समाधान व्यक्त केले. साळुंखे यांनी सर्व समस्या मुख्यमंत्री महोदय यांच्या पर्यंत पोहोचवून योग्य ते कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.