कोल्हापूर : विधानसभा निवडणूक निकाल लागण्याआधी जिल्ह्यातील दहापैकी एक आमदार अशी प्रकाश आबिटकर यांची सामान्य प्रतिमा होती. काळाचा महिमा असा की अवघ्या दोन महिन्यांत त्यांच्या राजकारणाची स्तिमित करणारी कमान आकाराला आली. विधानसभा निवडणुकीत विजयाची हटट्रिक पाठोपाठ आरोग्यासारखे वजनदार खाते आणि तगड्या नेत्यांची स्पर्धा असताना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद अशा तीन महत्त्वाच्या पायऱ्या त्यांनी एका पाठोपाठ एक सर केल्या आहेत. कोल्हापूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आता आबिटकर यांच्या भोवती स्थिरावला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात प्रकाश पर्व सुरू झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर जिल्ह्याच्या या सहस्रकातील राजकारणात प्रामुख्याने चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, धनंजय महाडिक यांचा प्रभाव दीर्घकाळ राहिला. मधल्या काळात विनय कोरे, प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर, जयवंतराव आवळे या माजी मंत्र्यांचीही चर्चा होत राहिली. यामध्ये राधानगरी – भुदरगड तालुका तसा जिल्ह्याच्या नेतृत्वाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिला. तो चर्चेत आला आबिटकर यांच्या कूस पालटलेल्या राजकीय वाटचालीमुळे.

आणखी वाचा-अवैध गर्भपाताची माहिती देणाऱ्या महिलांच्या मानधनात वाढ – आबिटकर

सुरुवातीच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी नंतर मागे वळून पाहिले नाही. या मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक करण्याची किमया साधली ती त्यांनीच. तथापि, दोन वेळा आमदार होऊनही ते जिल्ह्याचे नेते म्हणून ओळख निर्माण करण्यापासून अंमळ दूर राहिले. बड्या नेत्यांच्या स्पर्धेत आपला वेगळा ठसा राहावा असा फारसा काही प्रयत्न त्यांच्याकडून झाला नाही. नाही म्हणायला गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक, शेतकरी संघ अशा महत्त्वाच्या सहकारी संस्थांमध्ये आपले सहकारी संचालक म्हणून जावेत यासाठी केलेल्या प्रयत्नाना यश आले. आपला मतदारसंघ बरा नि त्याचे राजकारण बरे अशा सीमित विचाराने ते राजकीय पावले टाकत राहिले.

आणखी वाचा-जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच – हसन मुश्रीफ

विधानसभा निवडणुकीनंतर चित्र कल्पनातीत बदललेले आहे. महत्त्वाच्या आरोग्यमंत्रिपदा पाठोपाठ जिल्ह्याच्या राजकारणाचा दोर हाती असणारे पालकमंत्रिपद आबिटकर यांच्याकडे आल्याने त्यांचे जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्व वाढले आहे. साहजिकच, त्यांना जिल्ह्याच्या राजकारणात आपला स्वतःचा दबदबा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जिल्ह्यातील महायुतीचे मंत्री, खासदार, आमदार यांच्या सोबत काम करतानाच त्यांना स्वतःचे वलय निर्माण करावे लागेल. या तडफदार नेतृत्वाकडून जिल्ह्यातील जनतेच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात आबिटकर केंद्रीभूत झाले असले तरी यापुढे ते आपला नेमस्त, बुजरा स्वभाव बाजूला ठेवणार, की आक्रमक शैलीने आपले अस्तित्व दाखवून देणार हाच काय तो प्रश्न आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash abitkar is now the focus of kolhapur politics mrj