कोल्हापूर : कोल्हापुरातील विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावाच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी कोल्हापूर महापालिका, क्रीडा संघटना यांच्याबरोबर क्रीडा विभागाने चर्चा करून विषय मार्गी लावावा. आयआयटी पवई व सार्वजनिक बांधकामाच्या अहवालाची तपासणी करून दोषी असणाऱ्या संबंधित वास्तुविशारद, पुरवठादार तसेच जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

कोल्हापुरातील जिल्हा क्रीडा व विभागीय क्रीडा विभागाच्या कामकाजाचा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आबिटकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात मोठा वाव आहे. क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त निधी मिळावा म्हणून प्रयत्न केले जाणार आहेत. क्रीडाविषयक विकास कामांमधील प्राधान्यक्रम ठरवून खेळाडूंसाठी आवश्यक त्या कामांना प्राधान्य द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.

क्रीडा संकुल उभारणीसाठी तयार केलेला १५६ कोटींचा प्रस्ताव या आठवड्यात शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे उपसंचालक पाटील यांनी सांगितले. राज्य शासनाने २००९ मध्ये क्रीडा संकुलाच्या कामाला मंजुरी दिली. यात पहिल्या टप्प्यात शुटिंग रेंज, लॉन टेनिस कोर्ट, फुटबॉल मैदान, जलतरण तलाव डायव्हिंग बोर्ड, खो-खो मैदान, कबड्डी, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल मैदाने, ४०० मीटर धावपट्टी, इनडोअर हॉल, प्रशासकीय इमारत व क्रीडा वसतिगृह यांचा समावेश करण्यात आला होता. तयार झालेल्या बास्केटबॉल, फुटबॉल, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल या मैदानाचा दर्जा अतिशय खराब असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रदीर्घ कालावधी लागूनही जलतरण तलाव आणि शुटींग रेंजची साडेसाती संपलेली नाही. गाजावाजा करत जलतरण तलाव आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार हवा म्हणून तज्ज्ञ वास्तुविशारदाकडून त्याचा आराखडा बनवण्यात आला. तरीही कामात त्रुटी राहिल्याने संकुलाच्या संरक्षक भिंतींमागून जाणाऱ्या ओढ्याचे पाणी मुरून जलतरण तलावात येऊ लागले. सध्या त्यात गवत उगवले. जलतरण तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी मुरून येत असल्याचे तज्ज्ञाच्या लक्षात आले. त्यानंतर चर्चेत अनेक वर्षे निघून गेली. आराखडा समितीची नेमणूक आदी उपाययोजना करण्यात आल्या मात्र ठोस काही घडले नाही अशा जुन्या तक्रारी आहेत.

यावेळी आबिटकर म्हणाले, जिल्ह्यात असणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या क्रीडा प्रबोधिनी यांनी परस्पर समन्वयातून कामे करावीत. कोल्हापूर जिल्हा कुस्तीसाठी जगभर ओळखला जातो. त्याचबरोबर जलतरण, नेमबाजी, खो-खो या खेळात येथील खेळाडूंचे मोठे प्राविण्य आहे. त्यासाठी येथील सर्व क्रीडा संकुले अद्ययावत असणे आवश्यक आहे. यासाठी चांगल्या गुणवत्तेची क्रीडा संकुले व्हावीत तसेच खेळाडूंना आवश्यक राहण्यासाठी सुविधा निर्माण व्हाव्यात. जिल्ह्यातील क्रीडाविषयक विकास कामांमधील प्राधान्यक्रम ठरवून खेळाडुंसाठी आवश्यक सुविधा प्राधान्याने हाती घ्या. याबाबत यादी तयार करून क्रीडा विभाग, खेळाडू तसेच लोकप्रतिनिधी यांनी विचारविनिमय करून ज्या बाबी प्राधान्याने करणे आवश्यक आहेत, त्या लवकर हाती घ्या. जिल्ह्यातील सर्व क्रीडा संकुले वेळेत पूर्णत्वास नेऊन खेळाडूंना आवश्यक असणाऱ्या घटकांचा प्राधान्याने विचार करण्याच्या सूचना आबिटकर यांनी या बैठकीत दिल्या.

Story img Loader