प्रकाश आवाडे यांचे स्पष्टीकरण
काँग्रेस पक्षातील काही वरिष्ठांशी माझे मतभेद आहेत. योग्य वेळी मी माझी भूमिका जाहीर करणार आहे, असे मत माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. आवाडे हे सध्या कुठल्या पक्षात आहेत, ते काँग्रेस सोडणार, भाजपत प्रवेश करणार अशी विविध पातळीवरची चर्चा गेले काही दिवस चालू आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले.
ते म्हणाले, की काँग्रेसला सुबुद्धी सुचत नाही तोपर्यंत मी काँग्रेसचे काम करणार नाही, पण याचा अर्थ मी राजकारणातून संन्यास घेतला असे होत नाही. एकेकाळी वस्त्रनगरी इचलकरंजी वैभवाने झळाळून निघत होती, मात्र आजमितीला येथील वस्त्रोद्योग व्यवसाय लयाला जात आहे. त्याला सर्वस्वी केंद्र व राज्य सरकारचे धोरणच जबाबदार आहे. शासनाने घोषित केलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने शासनाने यंत्रमागधारक व कामगारांची घोर फसवणूक केल्याचा दावाही त्यांनी केला.
आवाडे यांनी वस्त्रोद्योग, यंत्रमाग कामगार, शहराचा विकास, राजकारण आदी विषयांवर आपली भूमिका मांडली. यंत्रमाग कामगारांसाठी माथाडी बोर्डच्या धर्तीवर कल्याणकारी मंडळ स्थापन करून ते कार्यान्वित करणे आवश्यक आहे. त्यासाठी माझ्या अध्यक्षतेखालील नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशींचा स्वीकार सरकारने केला होता. दुर्दैवाने त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाल्याने हा प्रश्न प्रलंबित राहिला. आता १२४ व्यवसायातील असंघटित कामगारांच्या कल्याणकारी मंडळात यंत्रमाग कामगारांचा समावेश करण्याची घोषणा करून शासनाने यंत्रमाग कामगारांची फसवणूक आहे. यंत्रमाग कामगारांसाठी घरकुलाचा प्रश्नसुद्धा जैसे थे च असून काँग्रेसच्या सत्ताकाळात मंजूर झालेली घरकुले सत्ताबदलानंतर रद्द केली गेली.
वारणा नळपाणी योजनेत राजकारणाचा शिरकाव झाल्याने आजही या योजना अर्धवट स्थितीत आहेत. सरकार जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी उदासीन असल्याची टीका केली. इचलकरंजी शहराला शटललेस लूम सिटी बनविण्याचे काम माझ्या कार्यकाळात झाले. आजही मी वस्त्रोद्योगाला ऊर्जतिावस्थेला नेण्यासाठी नियोजनबद्धरीत्या काम करीत आहे. त्यामुळे मी राजकारणापासून थोडा अलिप्त दिसत असलो तरी मी संन्यास घेतलेला नाही. त्यामुळे मी पुन्हा लवकरच सक्रिय भूमिकेत दिसणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश मोरे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, काँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील उपस्थित होते.