कोल्हापूर : एकदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आणि जिंकणार अशी गर्जना दोन दिवसापूर्वी करणारे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी आज महायुतीच्या प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आवाडे यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी जाऊन प्रचारात सक्रिय होण्याबाबत मनधरणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी घेतला होता. लोकसभा निवडणूक एकदाच लढणार आणि जिंकणार असा निर्धार त्यांनी केला होता. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे व आमदार प्रकाश आवाडे यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यानंतरही आवाडे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवला होता. तसेच मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही स्पष्ट केले होते.

हेही वाचा – कोल्हापूर : अजितदादांना धक्का; प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचा शाहू महाराजांना पाठिंबा

आवाडे यांची तलवार म्यान

महायुतीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा कोल्हापुरात आले आहेत. त्यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्या समवेत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, माजी मंत्री रामदास कदम होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आवाडे यांच्याशी चर्चा करून मनधरणी केली. त्यानंतर आवाडे यांचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे बंड थंड झाले. त्यांनी तलवार म्यान केली. त्यांना घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खासदार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज करण्यासाठी निघाले.

हेही वाचा – प्रचार लोकसभेचा पण मशागत विधानसभेची

महायुतीचा पेच दूर

याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी आमदार विनय कोरे व राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन त्यांना प्रचारात सक्रिय केले होते. तर आवाडे हे आता प्रचारात उतरले असल्याने हातकणंगले मतदारसंघात महायुतीमध्ये निर्माण झालेला पेच दूर होताना दिसत आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash awade rebel cools after cm eknath shinde talk to him he became active in campaigning for dhairyasheel mane ssb