कोल्हापूर : आजचा काळ प्रगत वैद्यकीय सेवेचा म्हणून ओळखला जात असला तरी आजही खेडोपाड्यात जुन्या प्रथा, परंपरा याचे आचरण केले जाते. त्यातीलच एक महत्वाची प्रथा म्हणजे ‘मरीआईचा गाडा’. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावात गेली १२४ वर्षे ही प्रथा पाळली जात आहे.
जरीआई – मरीआई या देवतांना ग्रामीण भागात आजही महत्व आहे. ‘जरी’ म्हणजे तापाची साथ. ‘मरी’ म्हणजे पटकी, देवी यांसारख्या रोगांची साथ. प्राणघातक साथींच्या रोगांची एक देवी कल्पून ती ‘जरी-मरी’ वा ‘जरीआई-मरीआई’ या नावाने महाराष्ट्रात पूजिली जाते.
हेही वाचा – कोल्हापूर : चंद्राबाबू नायडू सपत्निक महालक्ष्मीच्या चरणी, मोदींचे सरकार येण्याचा विश्वास
१९ वे शतक सुरु होत असताना कोल्हापुरात आलेल्या महाभयानक प्लेग रोगाने गावात प्रवेश करू नये यासाठी तेव्हापासून आजपर्यंत पन्हाळा तालुक्यात ‘मरीआईचा गाडा’ ओढला जातो. मान्सूनला सुरुवात होण्याआधी गावातील नागरिक एकत्र येऊन मरीआईची पूजा करतात. श्रीफळ, नारळ, साखर, आंबील, घुगऱ्याचा नैवेद्य दाखवून हलगीच्या तालावर तो गाडा दुसऱ्या गावच्या हद्दीमध्ये सोडून दिला जातो. दुसऱ्या गावातून तो गाडा पुढे-पुढे जात शेवटी तो जंगलात सोडून दिला जातो.
आजही आबालवृद्ध या परंपरेत सहभागी होतात, गावाला रोगराईपासून दूर ठेवावे ही यामागची श्रद्धा आहे, असे ज्येष्ठ नागरिक पी. आर. पाटील यांनी सांगितले.