दसऱ्याच्या मुहूर्तावर गुरुवारी सांगलीच्या सराफा बाजारात सोन्याची ग्राहकांनी लयलूट केली. सराफी बाजारात सोन्याच्या दरात चढ-उतार असला तरी दसऱ्याच्या पाश्र्वभूमीवर हा भाव २५० रुपयांनी वधारला. बाजार सुरू असताना असलेला दर मात्र सायंकाळी १०० रुपयांनी कमी झाला. दरात चढ-उतार असला तरीही बाजारात गर्दी ओसंडून वाहात होती. वाहन खरेदीसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजार पेठेत आज मोठी गर्दी होती. दसऱ्याचा मुहूर्त साधत सांगलीच्या बाजारात कोटय़वधी रुपयांची उलाढाल झाल्याने बाजारात चतन्य दिसून आले.
बुधवारी सोने बाजारात असलेला तोळ्याचा दर २७ हजार १०० रुपयांवरून आज बाजार सुरू होताच ग्राहकांचा उत्साह दिसताच २७ हजार ३५० रुपयांवर गेला. बाजारात २५० रुपयांची वाढ होऊनही ग्राहकांनी सोन्याची खरेदी मोठय़ा प्रमाणावर केली. मात्र ग्राहकांनी सोने खरेदी सुरूच ठेवली. सायंकाळी मात्र सोन्याच्या दरात १५० रुपये प्रतितोळा घसरण झाली असल्याचे अलंकार ज्वेलर्सचे अमोल भोकरे यांनी सांगितले. सोन्याच्या तुलनेत चांदीचा दर मात्र ३७ हजार असा स्थिर राहिला. बाजारात तयार दागिन्यांचे दर मात्र यापेक्षा दीडशे रुपयांनी अधिक होते. अलंकारापेक्षा चोख सोने असलेल्या वळ्यांना मागणी जास्त दिसून आली.
याबरोबरच शहरातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा बाजारही आज फुलला होता. तरुणाईला भुरळ घालणाऱ्या वाहनांची आगाऊ नोंदणी मोठय़ा प्रमाणात करण्यात आली होती. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी केलेल्या वाहनाची घरी नेण्यासाठीच धांदल उडाली होती. रेफ्रिजरेटर, धुलाई यंत्र, एलईडी, लॅपटॉप खरेदीसाठीही मोठी उलाढाल शहरात झाली. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर कापडपेठेतही खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होती. आजच्या मुहूर्तावर बाजारपेठेत कोटय़वधी रुपयांची उलाढाल झाली.
बाजारात झेंडूच्या फुलाने शंभरी पार केली. अपुरा पाऊस, खराब हवामान यामुळे अपेक्षित उत्पादन आले नसले तरी उत्पादकांना यंदा बाजारात चांगला दर मिळाला. किरकोळ बाजारात झेंडूचा दर १०० रुपये किलो असा असला तरी उत्पादकांना ४० ते ६० रुपये दर मिळाला. दिवाळीपूर्वी हा दर मिळाल्याने शेतकऱ्यांना एकप्रकारे बोनसच मिळाला आहे. यंदा अपेक्षित उत्पादन नसल्याने झेंडूचे दर दिवाळीला वाढण्याची शक्यता आहे.

Story img Loader