डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप

कोल्हापूर : प्रसूतीसाठी कळंबा येथील खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. राजश्री गिरीश पोवार (वय ३२, रा. अंबाई टँक) असे मृत महिले नाव आहे. खासगी हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यानेच राजश्री यांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप करत तिच्या नातेवाइकांनी संबधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल केल्या शिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

पोवार या गर्भधारणा झाल्यापासून कळंबा येथील अंकुर रुग्णालयात उपचार  घेत होत्या. नऊ  महिने पूर्ण झाल्याने गेल्या चार दिवसांपासून त्या रोज रुग्णालयात जात होत्या, मात्र, डॉक्टरांनी त्यांना दाखल करून घेतले नाही. मंगळवारी सकाळी त्या पती गिरीश यांच्यासोबत अंकुर रुग्णालयात गेल्या.

मात्र, दोन तास उलटले तरीही त्यांच्यावरच काहीच उपचार झाले नाहीत. रक्तदाब कमी होत असल्याचे परिचारिका सांगत होत्या, तरीही डॉक्टरांनी उपचार सुरू केले नाहीत. अखेर साडेअकराच्या सुमारास डॉक्टरांनी राजश्री यांना सीपीआरमध्ये हलवण्यास सांगितले. गिरीश यांनी त्यांच्या खासगी वाहनातून पत्नीस बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये दाखल केले. या वेळी अंकुर रुग्णालयातील डॉक्टरही सोबत होते. सीपीआरमधील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर राजश्री यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

राजश्री यांच्या अचानक मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाइकांनी खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना धारेवर धरले. काही वेळातच लक्ष्मीपुरी पोलिसांनी सीपीआरमध्ये धाव घेऊन नातेवाइकांची समजूत घातली.

Story img Loader