कोल्हापूर : ‘लोकसत्ता लोकांकिका’ अंतर्गत कोल्हापूर केंद्रात एकाहून एक सरस एकांकिकांचे सादरीकरण सलग दोन दिवस झाले. त्यातून ‘निर्झर’ (महावीर महाविद्यालय), ‘क’ ला काना का’ (देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज), ‘जंगल जंगल बटा चला है’ (शहाजी लॉ कॉलेज), ‘पार करो मोरी नैया’ (विवेकानंद कॉलेज) या कोल्हापुरातील चार तसेच ‘शहीद’( आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे) व ‘चाबूक’ (कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, उरुण, इस्लामपूर) या सहा एकांकिकांची विभागीय अंतिम स्पर्धेसाठी रविवारी निवड करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या मंचावर गेले दोन दिवस आशयघन, उत्तम एकांकिका रसिकांना पाहायला मिळाल्या. आशय आणि विषयात या दोन दिवसांतील एकांकिका दर्जा राखून होत्या. त्यातील विचार समकालीन तद्वत आधुनिक असल्याचे सादरीकरणातून दिसत होते. ग्रामीण भागातील कलाकार विद्यार्थ्यांची आर्थिक क्षमता कमी असतानाही नाटक सादर करण्याची धडपड जाणवत राहिल्याने उपस्थितांनी टाळय़ांच्या गजरात प्रतिसाद नोंदवला. त्यामुळे स्पर्धास्थळी उत्साहाचे वातावरण होते. परीक्षक, आयरिश प्रॉडक्शनच्या प्रतिनिधीनींही या प्रयत्नांना दाद दिली. या स्पर्धेसाठी नितीन धंदुके (पुणे) व सुषमा शिरीष शितोळे (कोल्हापूर) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांच्या हस्ते एकांकिकेतील कलाकारांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आयरिश प्रॉडक्शनचे प्रतिनिधी अनुपम दाभाडे, लोकसत्ता वितरण व्यवस्थापक संदीप गिरी उपस्थित होते.

हेही वाचा >>>राजू शेट्टी यांचा एकाचवेळी अनेकांशी सामना

दोन दिवसांत दर्जेदार एकांकिका सादर करण्यात आल्या. यातील बहुतांशी लेखन हे विद्यार्थ्यांचे होते. एकूण दर्जाही चांगला होता. मुलांनी एकांकिकेसाठी निवडलेले विषय हे सामाजिक आणि भोवतालचे विषय होते. त्यात आशयही उत्तम होता. काहीवेळेला लेखनात त्रुटी जाणवल्या. नवे विषय येताहेत ही आनंदाची बाब आहे. युवा कलाकारांनी विषय वरवर समजून न घेता त्याच्या खोलात जाऊन ते चिंतन केल्याचे जाणवले.  त्यातून दिग्दर्शनाचा व अभिनयाचा बारकाईने विचार दिसून आला. शिवाय नेपथ्य, मोंटाज यांतही नावीन्यता होती. नव्या काळानुसार फिल्मी प्रभावही निर्मितीवर जाणवतो. – सुषमा शितोळे, परीक्षक, कोल्हापूर</strong>

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या कोल्हापूर केंद्रातील एकंदरीत एकांकिकांचे सादरीकरण औचित्यपूर्ण विषयाने झाले. मानवी जगाची प्रगती आणि या प्रगतीला अधोगतीकडे नेणारी विचारसरणी यासारखे दाहक विषय कुशलतेने तितकेच गंभीरपणे हाताळले गेले. ही स्पर्धा अत्यंत वेगळय़ा धाटणीत पार पडली.  ‘लोकसत्ता’ने  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपलब्ध केलेल्या या मंचावरून ‘आयरिश प्रॉडक्शन’ कलागुणी विद्यार्थ्यांना व्यावसायिक मंच देण्यासाठी प्रयत्नशील आहे.  – अनुपम दाभाडे, प्रतिनिधी- आयरिश प्रॉडक्शन‘

लोकसत्ता लोकांकिका’च्या कोल्हापूर केंद्रातील स्पर्धामध्ये जोशपूर्ण, उत्साहवर्धक वातावरण अखेपर्यंत दिसून आले. प्राथमिक फेरीत विषयांचे कमालीचे वैविध्य होते. तरुणाईला पडणारे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला गेला, मांडणी पाहता लेखन कार्यशाळा घेण्याची गरज वाटते. लेखक नवागत आहेत त्यांना समजण्यासाठी किंवा नाटकाचा फॉर्म काय असतो ते कळावे म्हणून असा उपक्रम राबविल्याने नवीन लेखक तयार होतील. ग्रामीण भागातील मुलांमध्ये नाटकाविषयी तळमळ रुजली आहे, नाटक माध्यमाची जाण आहे, हे प्राथमिक फेरीत पाहायला मिळाले. तरुणाईमध्ये अस्वस्थपणा, बंडखोरी, नवोन्मेष किती ओतप्रोत भरला आहे हे त्यांच्या सादरीकरणांतून प्रत्ययास आले. – नितीन धंदुके, परीक्षक, पुणे</strong>

मुख्य प्रायोजक 

’सॉफ्ट कॉर्नर

सहप्रायोजक

’भारती विद्यापीठ, पुणे

’शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज संचलित विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिग अ‍ॅण्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट

पॉवर्ड बाय 

’केसरी टूर्स

’शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ मर्या, विजयनगर-अकलूज, ता. माळशिरस जि. सोलापूर

’श्री नेमिनाथ ज्वेलर्स

’एन एल दालमिया इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज

अँड रिसर्च

साहाय्य

’अस्तित्व

टॅलेंट पार्टनर

’आयरिस प्रॉडक्शन

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Presentation of saras one act plays at kolhapur centre kolhapur amy