कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात राष्ट्रवादी पदवीधर संघाचे अध्यक्ष व कार्यकारिणीने मंगळवारी राजीनामे दिले आहेत. अन्य पदाधिकारी उद्या राजीनामा देण्याची शक्यता आहे.
आज दिवसभर शरद पवार यांच्या राजीनामा संदर्भात वेगवेगळ्या घडामोडी घडल्या. त्याचे पडसाद आज जिल्ह्यात उमटले. कोल्हापुर राष्ट्रवादी पदवीधर संघाचे अध्यक्ष अनिल घाटगे म्हणाले, शरद पवार यांच्यासोबत आम्ही १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वीकारली. आज पवारांनी राजीनामा दिल्यानंतर आपण पण पदमुक्त व्हावे या विचाराने पदवीधर संघाची बैठक कार्याध्यक्ष अमोल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होवून सर्वांनी पदाचे राजीनामे प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे सादर केले आहेत.
हेही वाचा >>> शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर बहीण सरोज पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…
मुश्रीफ समर्थक रस्त्यावर
तर, कागल येथे पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आम्हा कार्यकर्त्यांना पोरकं करू नका, अशी हाक शहरातील कार्यकर्त्यांनी पवार यांना घातली. राज्यासह देशालाही तुमची गरज, राजीनामा मागे घ्या, अशा घोषणा आमदार हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी दिल्या. जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराज पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही आग्रही मागणी केली आहे. पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, या मागणीसाठी पक्षाचे कागल शहराध्यक्ष संजय चितारी यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा माने यांच्याकडे दिला.