सायझिंग कामगारांचा वेतनवाढीचा बेमुदत संप ५२ दिवसांनंतर संपुष्टात आल्यानंतर आता माथाडी कामगारांनी आंदोलनाचे शस्त्र बाहेर काढल्याने वस्त्रनगरी इचलकरंजीतील कामगारांचा संपाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे शनिवारी दिसून आली. ट्रकमध्ये सुताची बाचकी आणि कापडाच्या गाठी भरणी व उतरणी करण्यासाठी हमाल संघटनांनी तब्बल ८० टक्के वाढ मागितली आहे. तर शहरातील वाहतूकदार संस्थांनी मंगळवारी (१५ सप्टेंबर) लाक्षणिक बंदची घोषणा करून संपाची चुणूक दाखवली आहे.
वाहतूकदार संस्था व हमाल संघटना यांच्यात प्रत्येक तीन वर्षांनी वेतनवाढीचा करार होतो. यापूर्वी २००६ मध्ये झालेल्या करारानुसार ११ टक्के वाढ देण्यात आली होती. त्यापाठोपाठ २००९ मध्ये १२ टक्के तर २०१२ मध्ये २० टक्के वाढ दिली गेली. यंदा हमाली वाढ देण्यासाठी हमाल संघटना व वाहतूकदार संघटनांचे पदाधिकारी यांच्या सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात चार बठका झाल्या. मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही.
सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात झालेल्या बठकांना सहाय्यक कामगार अधिकारी अनिल गुरव, माथाडी कामगार मंडळाचे सचिव ए. बी. पुरीबुवा, वाहतूकदार संघटनांचे आनंदराव नेमिष्टे, रामचंद्र जगताप, बाबुराव सोनाळे, प्रदीप बहिरगुंडे, संजय पाटील, जितेंद्र जानवेकर, हमाल संघटना कृती समितीचे यशवंत लाखे, शामराव कुलकर्णी व धोंडीराम जावळे आदी उपस्थित होते. सुताची बाचकी उतरण्यासाठी सध्या सहाचाकी ट्रकसाठी ५०० रुपये देण्यात येतात. त्यामध्ये १०० रुपयांची वाढ देण्याची तयारी वाहतूक संस्थांची असली तरी ४०० रुपये वाढ दिली पाहिजे अशी मागणी हमाल संघटनांची आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक बाचके गोडावूनमध्ये ठेवण्यासाठी २ रुपये दिले जातात. त्याऐवजी ७ रुपयांची मागणी आहे. तसेच कापडाच्या गाठीला प्रति टनास सध्या ७३ रुपये दिले जातात. त्याऐवजी ८५ रुपये देण्याची तयारी वाहतूकदार संस्थांची असली तरी हमाल संघटनांची मागणी ११० रुपयांची आहे.
दरम्यान, हमाल संघटनांनी ३१ ऑगस्टपासून सुतांच्या बाचक्यांची डोअर टू डोअर डिलिव्हरी देणे बंद केले आहे. अशाप्रकारच्या अन्यायी मागणीच्या विरोधात वाहतूकदार संघटना मंगळवारी लाक्षणिक बंद पाळणार असल्याचे ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे प्रमुख रामचंद्र जगताप यांनी सांगितले.
सायझिंग कामगारांपाठी आता माथाडी कामगारांचे आंदोलन
सायझिंग कामगारांच्या बेमुदत संपानंतर आता माथाडी कामगारांचे आंदोलन
Written by अपर्णा देगावकर
First published on: 13-09-2015 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro labor movement after sizing workers