कोल्हापूर : महाराष्ट्रातील प्रबोधन, पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळींचे अग्रणी, ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री प्रा. डॉ. एन. डी. पाटील (९३) यांचे सोमवारी निधन झाले. कोल्हापुरात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कष्टकरी, शोषितांचा आधारवड आणि पुरोगामी चळवळीचे लढाऊ नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

पाटील यांना गेल्या वर्षी करोनाची लागण झाली होती़  मात्र, ते करोनामुक्त झाले होत़े  गेल्या आठवडय़ात त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच रुग्णालय आणि निवासस्थानी कार्यकर्ते, नागरिकांनी गर्दी केली होती.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
दवाखान्यातील चिठ्ठीमुळे कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटली, आठवड्याभरापूर्वी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह
thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
कर्जाला कंटाळून मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या 
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Doctor aggressive after being beaten by relatives The pediatric department of VN Desai Hospital was closed by doctors Mumbai news
नातेवाईकांकडून मारहाण झाल्याने डॉक्टर आक्रमक; व्ही. एन. देसाई रुग्णालयातील बालरोग विभाग डॉक्टरांनी ठेवले बंद

प्रा. एन. डी. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी खर्च केले. १५ जुलै १९२९ रोजी सांगली येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला. विधी शाखेचे पदवीधर असलेल्या पाटील यांनी प्रारंभी सातारा येथे प्राध्यापक म्हणून काम केले. १९४८ मध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मुंबईत सामाजिक कार्य सुरू केले. ते १९५७ साली गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस होते. १९६२ ते ८२ या कालावधीत ते विधान परिषदेचे सदस्य होते. १९७८ ते ८० या कालावधीत सहकारमंत्री पदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. १९८५ साली ते कोल्हापूर मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेले होते.

राज्यातील अनेक पुरोगामी चळवळीशींशी त्यांचा निकटचा संबंध होता. अनेक आंदोलनांचे नेतृत्व त्यांनी केले. गोवा मुक्ती लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, साराबंदी चळवळ, शेतकरी दिंडी, दुष्काळ निवारण मोर्चा, शेतकरी आंदोलने, शेतीमालाला हमीभाव, सेझविरोधी आंदोलन, उच्च न्यायालयाचे खंडपीठ, शिक्षणविषयक श्वेतपत्रिका, एन्रॉन विरोधी आंदोलन, कोल्हापुरातील टोलविरोधी आंदोलन, वीजदरवाढ, पिण्याच्या पाण्याच्या हक्काचे आंदोलन, कापूस आंदोलन, शिक्षण बचाव आंदोलन, जागतिकीकरण विरोधी लढा अशा अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. त्यासाठी लाठीमार, तुरुंगवास, गोळीबारही त्यांना झेलावा लागला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन तीन विद्यापीठांनी डी. लीट ही सन्माननीय उपाधी देऊन सन्मानित केले होते.

आज शासकीय इतमामात अंत्यविधी

मंगळवारी येथील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. करोनाच्या नियमांमुळे अंत्ययात्रा निघणार नाही. ते समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन व विवेकवादी चळवळीचे अग्रणी असल्याने कोणत्याही कर्मकांडाशिवाय त्यांचा अंत्यविधी होणार आहे. करोनाच्या नियमांमुळे केवळ २० लोकांच्या (कुटुंबीयांच्या) उपस्थितीत अंत्यविधी होणार आहे. कार्यकर्त्यांनी शाहू महाविद्यालयात अंत्यदर्शनासाठी यावे, मात्र अंत्यविधीच्या ठिकाणी गर्दी करू नये,असे आवाहन त्यांच्या पत्नी सरोजताई पाटील व कुटुंबीयांनी केले आहे.

जीवनपट

नारायण ज्ञानदेव पाटील (एन. डी. पाटील) यांचा जन्म १५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यातील नागावमधील ढवळी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए आणि एल.एल.बी.चे शिक्षण घेतले होते.

अध्यापन कार्य

* १९५४- १९५७ या काळात छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर

* १९६०मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, इस्लामपूर येथे प्राचार्य.

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

* १९६२ : शिवाजी विद्यापीठातील पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य   १९६५ : शिवाजी विद्यापीठात सिनेट सदस्य

* १९६२-१९७८ : शिवाजी विद्यापीठाचे कार्यकारिणी सदस्य

* १९७६-१९७८ : शिवाजी विद्यापीठात सामाजिकशास्त्र विभागाचे अधिष्ठाता १९९१ : महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षण आयोगाचे सदस्य

* रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून 

* रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन- १९९० पासून

* दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बेळगाव अध्यक्ष- १९८५ पासून

राजकीय कारकीर्द

* १९४८ : शेतकरी कामगार पक्षात प्रवेश

* १९५७ : मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस

* १९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य

* १९६९- १९७८, १९८५-२०१० : शे.का.प.चे सरचिटणीस

* १९७८-१९८० : सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य

* १९८५-१९९० : महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )

* १९९९-२००२ : निमंत्रक, लोकशाही आघाडी सरकार

* महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते

पुरस्कार/ सन्मान

* भाई माधवराव बागल पुरस्कार : १९९४

* स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड- डी. लिट. पदवी : १९९९

* राष्ट्रीय बियाणे महामंडळ (अध्यक्ष) भारत सरकार : १९९८- २०००  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ- डी. लिट. पदवी : २०००  विचारवेध संमेलन, परभणी अध्यक्षपद : २००१

* शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर- डी. लिट. पदवी 

* शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार

भूषविलेली पदे

* रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य

* समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी- उपाध्यक्ष

* अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र-  अध्यक्ष

* डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी, सातारा- अध्यक्ष

* जागतिकीकरण विरोधी कृती समिती- मुख्य निमंत्रक

* महात्मा फुले शिक्षण संस्था, इस्लामपूर- अध्यक्ष

* दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था, बेळगाव- अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती- सदस्य

प्रसिद्ध लेखन

’ समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)

’ शेतजमिनीवरील कमाल

मर्यादा आणि महाराष्ट्र

* सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका)- १९६२ 

* कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका)- १९६२ 

* शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका)- १९६३ 

* वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट (पुस्तिका)- १९६६

* महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे (White Paper) कृष्णस्वरूप (पुस्तिका)- १९६७ 

* शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत (पुस्तक)- १९७०

* शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी? (पुस्तिका)- १९९२ 

* महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (पुस्तिका)

* नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण(नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने )

आदरांजली

महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाबद्दल आस्था असलेला, जनहिताशी अखेपर्यंत बांधिलकी जपणारा, तत्त्वनिष्ठ व नि:स्वार्थी नेता आज हरपला आहे. डॉ. एन. डी. पाटील यांनी उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी विधिमंडळातही आवाज उठवला. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले होते. शेतकरी कामगार पक्षाची धुरा निष्ठेने सांभाळणाऱ्या एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची जबाबदारीही त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तितक्याच क्षमतेने पार पाडली. संस्थेच्या वाटचालीतील त्यांचे योगदान कधीच पुसले जाणार नाही. 

शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष

*****

प्रा. एन. डी. पाटील हे जनसामान्य, कष्टकरी, शेतकरी व कामगारांसाठी अतिशय पोटतिडिकीने काम करणारे झुंजार नेते होते. कोणताही प्रश्न ते अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडत आणि त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करत. शिक्षण क्षेत्राकरिता त्यांचे कार्य मोठे होते. अनेक आंदोलने व विधायक चळवळींना त्यांनी नेतृत्व प्रदान केले. राज्य विधान मंडळाचे सदस्य म्हणून दीर्घकाळ काम करणारे प्रा. पाटील आदर्श लोकप्रतिनिधी होते. त्यांच्या निधनामुळे शिक्षण, समाजकारण व राजकारण यांसह विविध क्षेत्रांमध्ये वावर असलेल्या एका प्रामाणिक लोकनेत्याला आपण मुकलो आहोत. 

भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

*****

शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे. महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे. प्रा. एन. डी. पाटील हे राज्याच्या पुरोगामी विचारांचे व्यासपीठ होते. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची मशाल त्यांनी शेवटपर्यंत पेटत ठेवली. लढणे आणि संघर्ष करणे हेच त्यांचे जीवन होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातले ते एक बिनीचे शिलेदार होतेच, पण त्यानंतरच्या बेळगावसह सीमालढय़ातील प्रत्येक आंदोलनात एन. डी. पाटील आघाडीवर होते. सीमाभागात जाऊन त्यांनी लढे दिले व पोलिसांच्या लाठय़ा खाल्ल्या. महाराष्ट्रासाठी त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी होते. एन. डी. पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याचे अतोनात नुकसान झाले असून मी त्यांना महाराष्ट्र राज्यातर्फे आणि शिवसेनेतर्फे अभिवादन करतो.

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

*****

गेली सात दशके अनेक सामाजिक-राजकीय घडामोडींचे साक्षीदार, धडाडीचे कामगार नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दु:खाच्या समयी त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकियांच्या दु:खात मी सहभागी आहे. शेतकरी-कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी धडाडीने सोडविले. गिरणी कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी मोठा लढा दिला. सतत नवीन विचारांचा ध्यास, ही त्यांची ओळख होती. सुमारे २२-२३ वर्षे त्यांनी विधिमंडळ गाजविले. त्यांच्या निधनाने दूरदृष्टी लाभलेला नेता हरपला आहे.

देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

*****

महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील म्हणजे सामान्य माणसाच्या संघर्षांचा कृतिशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनाने शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारे संघर्षशील नेतृत्व हरपले आहे. सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला आहे. प्रा. एन. डी. पाटील निर्भीड, नि:स्पृह, निडर नेते होते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी काम केले. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे.  प्रा. एन. डी. पाटील हे आमच्या कुटुंबातील सदस्य होते. त्यांचे निधन हे महाराष्ट्रातल्या, सीमाभागातल्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहे.

अजित पवार, उपमुख्यमंत्री

*****

ज्येष्ठ नेते, माजी सहकारमंत्री प्रा. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे सार्वजनिक जीवनातील एक ऋषितुल्य, लढवय्ये, लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. ते विधिमंडळातील आणि चळवळीतील धडाडती तोफ होते. त्यांच्या रूपात शेतकरी व कष्टकऱ्यांचा एक बुलंद आवाज हरपला आहे. त्यांचे संपूर्ण जीवन लोकांसाठी समर्पित राहिले. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले. सार्वजनिक संस्थांचा कारभार कसा चालवावा, याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले होते. आचार, विचार आणि कर्तृत्वाने राजकारणात व समाजकारणात त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण झाले होते. त्यांचा जीवनपट व कार्य पुढील अनेक पिढय़ांसाठी मार्गदर्शक राहील. 

अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री