रविवारच्या सुटीच्या दिवसाची संधी साधत महापालिका निवडणुकीच्या आखाडय़ात उतरलेल्या उमेदवारांनी प्रचाराची राळ उठवली. संपर्क दौरा, कोपरा सभा, प्रचार फेरी या माध्यमातून मतदारांपुढे आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून झाला. राजकीय पक्षांनीही दिवसभर प्रचाराची धूम उडवली होती. यामुळे महापालिका निवडणुकीचे वातावरण आज ठळकपणे नजरेत भरले.
महापालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज सादर करणे, माघार, छाननी व चिन्ह वाटप ही महत्त्वाची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेमध्ये कोठे अडचण येऊ नये याची काटेकोर दक्षता सर्वच उमेदवारांनी घेतली होती. यामुळे उमेदवारांना प्रचाराकडे पुरेसे लक्ष पुरविता आले नव्हते. शनिवारी रात्री चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली. चिन्ह मिळाल्याची खात्री पटल्यानंतर उमेदवारांनी प्रचारामध्ये मनापासून लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. त्याची प्रचिती रविवारी दिसून आली.
रविवार हा सुटीचा दिवस असल्याने मतदारांशी संपर्क साधण्याची नामी संधी उमेदवारांना आली होती. ही संधी साधत उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मतदारांशी थेट भेट, प्रचार यात्रा, कोपरा सभा या माध्यमातून प्रचारामध्ये लक्ष घातले. मतदारांना आपली विधायक कामाची भूमिका पटवून देण्याचे काम त्यांनी केले. निवडणुकीसाठी मिळालेले चिन्ह, कामाची पाश्र्वभूमी याबाबतची माहिती पत्रके वितरित करण्यात आली. पक्षाचा झेंडा, चिन्हाचे कटाऊट आणि घेषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांसमवेत निघालेल्या प्रचार फेऱ्यांमुळे निवडणुकीचे वातावरण खऱ्या अर्थाने तापल्याचे चित्र करवीरनगरीत पहायला मिळाले.
राजकीय पक्ष जोरात
उमेदवारांबरोबर राजकीय पक्षांनीही रविवारी प्रचाराची आघाडी उघडली होती. शिवसेनेच्या नेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या प्रचाराची मोहीम उघडली. सेनेच्या कार्याचे महत्त्व पटवून देताना त्यांनी भाजप-ताराराणी आघाडीला टीकेचे लक्ष्य केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष महेश जाधव यांनी भाजपाच्या प्रचाराचे नियोजन करून तशी दिशा दिली. माजी मंत्री सतेज पाटील यांनी रविवारचा दिवस प्रचारासाठी िपजून काढला, तर रात्री माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडला गेला.

Story img Loader