केंद्र सरकारच्या सर्व शासकीय योजना व राज्य सरकारची समाधान योजनेची माहिती ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी गडिहग्लज येथे शुक्रवार दि. ६ पासून लोक माहिती अभियानाचे आयोजन केले आहे. रविवार दि. ८ पर्यंत चालणाऱ्या या अभियानात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत माहिती पुरविली जाणार आहे, अशी माहिती पुणे पत्र सूचना कार्यालय, संचालिका अल्पना पंत शर्मा व मुंबई पत्रसूचना कार्यालय मीडिया अधिकारी सय्यद अख्तर यांनी दिली.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे विविध विभाग, कोल्हापूर जिल्हा प्रशासन, कोल्हापूर जिल्हा परिषद, गडिहग्लज पंचायत समिती यांच्या सहकार्याने व पत्र सूचना कार्यालय व क्षेत्रीय प्रचार निदेशालयन यांच्या वतीने आयोजन केले आहे. गडिहग्लज येथील महाराणी राधाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला येथे सकाळी, दि. ६ रोजी सकाळी १० वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत अभियानाचे उद्घाटन होणार आहे. यानंतर सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व शेतकरी मेळावा होणार आहे. यामध्ये प्रधानमंत्री बीमा सुरक्षा योजना, स्वच्छ भारत अभियान, सांसद आदर्श ग्राम योजना, एकात्मिक आदिवासी विकास योजना, जन धन योजना, कृषी योजना, पशू संवर्धन योजना आदींची माहिती दिली जाणार आहे. शनिवार दि. ७ रोजी सकाळी १०.३० वाजता महिला मेळावा होईल. यामध्ये बेटी बचाओ, बेटी बढाओ, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना, पेट्रोलियम संवर्धन आणि संसाधन योजना, बचत गट आणि महिला सबलीकरण, एकात्मिक बाल विकास योजना आदींची माहिती दिली जाणार आहे.
रविवार, दि. ८ रोजी सकाळी १०.३० वाजता युवक मेळावा होईल. यामध्ये युवक रोजगार योजना, खादी ग्रामोद्योग योजना, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिक्षण, जिल्हा औद्योगिक केंद्र/सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योग, राष्ट्रीय बँकांच्या कर्ज योजना आणि प्रधानमंत्री जन धन योजना, कौशल्य वर्धन योजना, सर्व शिक्षा अभियान आदींची माहिती दिली जाणार आहे. तसेच दि. ६ ते ८ रोजी दररोज सायंकाळी ५ ते ९ या वेळेत मनोरंजनात्मक कार्याक्रमातून शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा