कोल्हापूर : पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ कामगारी बजावण्यास दक्ष झाला असताना त्याला पुणेरी कोंदण लाभले आहे. राजेंद्र सुरा, सुबोध बापट, मंगेश व तेजस या जगताप बंधुंचा कांगारू संघात समावेश आहे. स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे जे काही भवितव्य घडेल त्यात पुण्यनगरीतील या चौघांचा सिंहाचा वाटा असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी दिल्ली येथे पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ अनेक कारणांनी लक्ष वेधून घेत आहे. एकतर या संघाचे नेतृत्व आणि संघटन इचलकरंजीच्या ओजस कुलकर्णी या तरुणाकडे आहे. दुसरे म्हणजे त्याने बांधणी केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये पुण्यातील एक दोन नव्हे तर चौघांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे या चौघांचा वयोगटही १८ ते ५८ असा तीन पिढ्यांना सामावून घेणारा आहे. चौघांचे खेळातील योगदानही तितकेच लक्षवेधी ठरणारे आहे. राजेंद्र सुरा हे यातील ज्येष्ठ. साठीकडे पोहोचलेले. ५८ वयाच्या सुरा यांचा उत्साह विशीतील तरुणाला लाजवणारा. स्थानिक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेले सुरा यांनी ऑस्ट्रेलियात एक कंपनी उभी केलेली आहे. त्यांनी आशिष कुलकर्णीबरोबर संघ बांधणीसाठी प्रयत्न केले. विशेष म्हणजे तब्बल तीन तपानंतर (३५ वर्षे) ते खो – खोचे मैदान गाजवण्यासाठी त्यांनी शड्डू ठोकला आहे.

हेही वाचा >>>वीस टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट येत्या दोन महिन्यांत, नितीन गडकरी यांची घोषणा

पुण्याच्याच सुबोध बापट याची कामगिरीही लक्ष वेधणारी. रमणबाग शाळेत शिकत असल्यापासून ते नवमहाराष्ट्र संघाकडून खेळताना अनेक जिल्हास्तरीय पासून राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आहे. बापट घराण्यात तसा खो खोचा वैभवशाली वारसा. त्याची बहीण सुखदा बापट हिने खो खोचे मैदान गाजवलेले. मानाच्या शिवछत्रपती पुरस्काराची ( २००१- ०२) ती मानकरी. ऑस्ट्रेलियामध्ये पाय ठेवल्यापासून गेल्या २४ वर्षांत सुबोधने तसा खो खोशी संन्यास घेतलेला. एकदा खो-खो विश्वचषक स्पर्धेविषयीचा एक संदेश त्याने समाज माध्यमात पाहिला आणि तेव्हापासून त्याचे पाय खो-खोकडे वळले. आता तर थेट नवी दिल्लीच्या मैदान गाजवण्यासाठी तो सज्ज झाला आहे. सध्या तो एशिया पॅसेपिक कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम पाहतो.

हेही वाचा >>>कोल्हापुरात अतिक्रमण विरोधी मोहीम

जगताप कुटुंबीयाचे योगदान

ऑस्ट्रेलिया संघाचे आणखी एका कारणाने आकर्षण वाढणारे आहे. ते म्हणजे जगताप कुटुंबीयाचे योगदान. तेजस २४ वर्षांचा तरुण तर त्याचा १८ वर्षीय तेथे बारावीत शिकणारा भाऊ मंगेश. दोघांनीही ऑस्ट्रेलियात खो-खोमध्ये भरीव कामगिरी केली आहे. त्यांचे वडील संदीप जगताप हे ऑस्ट्रेलिया संघाचे प्रायोजक आहेत. ते फिन्सवर्स या कंपनीचे चालक. पदवी मिळवल्यानंतर तेजस हा या कंपनीत संचालक आहे. अशी ही पुणेरी पलटण विश्वचषक खो खो स्पर्धेत किती लक्षवेधी कामगिरी करते, याकडे आता पुणेकरांचेच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punes rajendra sura subodh bapat mangesh jagtap tejas jagtap participate in australian kho kho team kolhapur news amy