राज्यभर शिक्षकदिनाचे निमित्त साधून शिक्षकदिन साजरा केला जात असताना येथे विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, संस्थांचे पदाधिकारी यांनी जिल्हा परिषदेसमोर शनिवारी निदर्शने करीत ‘काळा शिक्षक दिवस’ साजरा केला. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चार तासांहून अधिक काळ प्रवेशद्वारात या आंदोलन करीत शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवला.
राज्यातील विनाअनुदानित शाळांसाठी निधीची तरतूद करावी, शिक्षकांचा पगार सुरू करावा यासाठी राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने आंदोलन सुरू केले आहे. शिक्षक आमदारांनी पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, अर्थमंत्री यांनी आश्वासन दिल्यामुळे जुलै महिन्यात शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र अद्यापही या मागण्यांची पूर्तता न झाल्याने या संघटनेने शिक्षकदिन हा काळा शिक्षकदिन म्हणून पाळण्याचे जाहीर केले होते.
त्यानुसार जिल्हय़ातील विनाअनुदानित शाळांचे शिक्षक, पदाधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. काळय़ा फिती बांधलेल्या शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यामध्ये संघटनेचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, सुनील कल्याणी, गजानन काटकर, प्रकाश पाटील, एस. एन. पाटील आदी सहभागी झाले होते. शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

Story img Loader