कोल्हापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, उसाची ‘एफआरपी’ची किंमत एकरकमी मिळावी आदी मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी मागण्यांचे निवेदन निवडणूक अधिकारी संगीता चौगुले यांना देण्यात आले. तसेच राज्य विद्युत मंडळाने शेती पंपावर आकारलेला वाढीव दर रद्द केल्यानंतरच शेतकरी वीजबिल भरतील असा इशाराही या वेळी दिला.
जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्के पाऊस पडल्याने दुष्काळ छाया जाणवू लागली आहे. साखर कारखान्यांनी अद्यापही उसाची थकीत देयके दिली नसल्याने दसरा-दिवाळी सण कसा साजरा करायचा, याची विवंचना जाणवत आहे. शेतकऱ्यांची अनेक प्रश्न निर्माण झाले असून, त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. टेंबे रोडवरील शेकाप कार्यालयापासून मोर्चास सुरुवात झाली. िबदू चौक, फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर माग्रे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी केले. मोर्चामध्ये शेतकऱ्यांसह कार्यकत्रे मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी घोषणाबाजी केली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये यंदाच्या हंगामासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेली उसाची एफआरपीची किंमत एकरकमी मिळालीच पाहिजे, यंदाच्या हंगामात पिकविलेल्या सर्व उसाचे गाळप करण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारावी, खरीप हंगामातील पिके केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीने खरेदी केंद्रे सुरू करावी, धान्याची खरेदी फिरत्या वाहनातून आठवडा बाजारामध्ये करावी, भात व सोयाबीन खरेदी केंद्र १५ ऑक्टोबरपासून सुरू करावी. ग्रामीण भागातील घरफाळय़ाबाबत शासनाने काढलेल्या नवीन परिपत्रकाची अंमलबजावणी रद्द करावी, राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून पशुखाद्य व चाऱ्याच्या वाढलेल्या दरानुसार दुधाचे दर वाढवून द्यावे. एक गॅस सिलिंडरधारकांना पूर्वीप्रमाणे रॉकेलचा कोटा द्यावा. संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, बांधकाम कामगारांच्या योजना पूर्ववत सुरू कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या. या वेळी भारत पाटील, दत्तात्रय पाटील, दिलीपकुमार जाधव, बाबुराव कदम, शिवाजी साळुंखे, केरबा पाटील, जनार्दन जाधव, अशोकराव पवार पाटील, आदींसह कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
एकरकमी एफआरपीसाठी शेकापचा कोल्हापुरात मोर्चा
शेती पंपावरील वाढीव दरासही विरोध
Written by अपर्णा देगावकर

First published on: 09-10-2015 at 03:00 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pwp front for lump sum srp in kolhapur