कोल्हापूर महापालिकेतील आठव्या सभागृहात जाऊ इच्छिणाऱ्या ५०६ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रामध्ये बंद झाले. दिवसभर रांगा लावून करवीरकरांनी मतदान केले असल्याने सोमवारी होणाऱ्या मतमोजणीच्या कौलाकडे लक्ष वेधले आहे. किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडल्याने निवडणूक व पोलीस प्रशासनाने सुटकेचा श्वास टाकला. तर निवडणुकीच्या रिंगणात असणारे भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या चारही प्रमुख पक्षांनी आपणच स्वबळावर सत्तेत येऊ, असा दावा केला आहे.
गेल्या महिनाभरापासून करवीरनगरीत निवडणुकीची धूम सुरू होती. रविवारी मतदानाचा दिवस उजाडल्यापासूनच उत्साही मतदारांनी मतदान केंद्राकडे धाव घेतली. सकाळ, दुपार व सायंकाळी मतदान थांबण्याचा अवकाश येईपर्यंतच्या दिवसभराच्या संपूर्ण काळात मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या ताराराणी पार्क, रुईकर कॉलनी, नागाळा पार्क, राजारामपुरी या भागासह शहरातील सर्वच प्रभागांतील मतदान केंद्रांमध्ये मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सर्वच मतदार केंद्रांमध्ये मतदार थांबून राहिले असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. अपंग, वृद्धांनीही शारीरिक दुर्बलतेवर मात करीत मतदानाचा हक्क बजावला.
महापालिकेची निवडणूक बहुरंगी होत असल्याने त्यामध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे. चार दिवसांपूर्वी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व भाजप-ताराराणी आघाडीच्या प्रमुखांमध्ये हाणामारी, पक्ष कार्यालय फोडण्याचे प्रकार घडल्याने मतदान शांततेत पार पडणार का, याविषयी साशंकता होती. मात्र, आज किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. राजकीय वैर विसरून अनेक उमेदवार एकाच जागी थांबून केंद्रात येणाऱ्या मतदारांना नमस्कार करीत होते. तर बूथवर उभ्या असणाऱ्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्येही सुसंवाद दिसत राहिल्याने पोलीस प्रशासनाला फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी ओळखपत्र सक्तीचे केल्याने काही मान्यवरांना घरी जाऊन ते पुन्हा आणल्यानंतरच मतदान करावे लागले. मतदानाच्या शाईचा दर्जा निकृष्ट असल्याने त्याविषयी तक्रारी आल्या होत्या. चंद्रेश्वर गल्ली, सदर बाजार येथे किरकोळ वादावादीचे प्रसंग घडले.
निवडणूक आत्यंतिक चुरशीने होत असल्याचे मतदारांच्या प्रतिसादातून जाणवत होते. कोणा एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे दिसत असले तरी पालकमंत्री, भाजप नेते चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील व शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर अशा सर्वानीच आपण स्वबळावर सत्तेत येऊ असा दावा केला आहे.
मतदानासाठी करवीरकरांनी लावल्या रांगा
किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार
Written by अपर्णा देगावकर
First published on: 02-11-2015 at 03:15 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Queues for voting in kolhapur