कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणाचा पहिला स्वयंचलित दरवाजा आज सकाळी सव्वाआठ वाजता उघडण्यात आला. त्यानंतर दुसरा दरवाजा सकाळी 9:10 वाजता उघडण्यात आला. दुसरे स्वयंचलित द्वार क्रं. ५ उघडले आहे. ५ व ६ या दोन दरवाज्यांतून ४२५६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामुळे इशारा पातळीवरून वाहणाऱ्या पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढवण्याची शक्यता आहे.
राधानगरी येथे राजर्षी शाहू महाराज यांनी धरण बांधले आहे. या धरणामुळे कोल्हापूरची भूमी सुजलाम सुफलाम होण्यास मदत झाली. या धरणात जलसंचय वाढला की स्वयंचलित दरवाजे उघडले जातात.
हेही वाचा – कोल्हापुरात पूरस्थितीत वाढ; पन्हाळा तालुक्यात डोंगर खचला
अफवांचे पीक
राधानगरी धरण काल पूर्णत: भरले होते. त्यामुळे दरवाजे कधी उघडले जाणार याकडे लक्ष वेधले होते. मात्र काही अति उत्साही लोकांनी जुन्या चित्रफिती पाठवून धरणाचे दरवाजे उघडले आहेत अशी अफवा पसरवली होती. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. धरणाचे कोणतेही दरवाजे उघडले नाहीत असा खुलासा जिल्हा प्रशासनाने काल रात्री अकरा वाजता केला होता.
पहिला दरवाजा उघडला
या पार्श्वभूमीवर आज सकाळी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा पहिला दरवाजा उघडण्यात आला. यावेळी तेथे जमलेल्या लोकांनी आनंद व्यक्त केला. एका दरवाज्यातून १४२८ क्युसेक तर पाॅवर हाऊसमधून १४०० क्युसेक असा २८२८ क्युसेक विसर्ग सुरू झाला होता.
हेही वाचा – कोल्हापुरात वारसाहक्क स्थळातील वास्तूची भिंत कोसळून महिला ठार, दुसरी जखमी
कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी ४० फूट ४ इंच असून त्यातून ६००२२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. (पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे) जिल्ह्यातील ८१ बंधारे पाण्याखाली आहेत.
वारणेची पाणीपातळी वाढणार
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्याकरिता आज सकाळी ११ वाजता धरणांतून चालू असलेल्या विसर्गात वाढ केली जाणार आहे. वक्र द्वारमधून १५४५ क्युसेक व विद्युत जनित्रमधून ९११ क्युसेक असे एकूण २४५६ क्युसेक सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ होणार असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे, अशी सूचना वारणा धरण व्यवस्थापनाने सकाळी नऊ वाजता केली आहे..