लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : उसाला दर वाढवून मागत आहात तर राजू शेट्टी तुम्ही तुमच्या स्वाभिमानी दूध दर संघाचा दूध दर शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे द्यावा. तसे केले तर लोकसभेचीच नव्हे तर कोणतीच निवडणूक लढणार नाही, असे प्रतिआव्हान जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कल्लाप्पांना आवाडे जवाहर कारखान्याचे केन कमिटीचे चेअरमन राहुल आवाडे यांनी शेट्टी यांना रविवारी दिले.
ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि जवाहर कारखान्याचे संचालक, आमदार प्रकाश आवाडे यांच्यात जुगलबंदी सुरू आहे. प्रकाश आवाडे यांनी जवाहर कारखान्याने आम्ही मागितल्या प्रमाणे दर दिला तर लोकसभा लढवणार नाही असा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.
आणखी वाचा-मला मुख्यमंत्री करा; सर्व प्रश्न सुटतील, संभाजीराजेंचा पुनरुच्चार
त्याला लगेचच उत्तर देताना राहुल आवाडे म्हणाले, कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रात काम करत असताना त्यातून कोणताही लाभ घेतलेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने उमेदवारी दिली तर ती लढवण्याची तयारी माझी आहे. याचवेळी राजू शेट्टी यांनी प्रकाश आवाडे यांनी जवाहर कारखान्याने मागील हंगामासाठी ४०० रुपये व चालू हंगामासाठी ३५०० रुपये पैसे द्यावेत; अन्यथा निवडणूक लढवणार नाही, असे आव्हान दिले आहे.
आणखी वाचा-…तर लोकसभा निवडणूक लढवणार नाही; राजू शेट्टींचं आवाडेंना प्रत्युत्तर
शेट्टींची दरात कपात
यावर माझे म्हणणे आहे की राजू शेट्टी हेही एक दूध संघ चालवतात. राज्य शासनाने गायीच्या दुधाला प्रति लिटर ३४ रुपये दर द्यावा असे ठरवलेले आहे. पण शेट्टी यांचा दूध संघ कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिलिटर २ रुपये, कर्नाटकात प्रतिलिटर ४ रुपये तर आटपाडी, जत भागात प्रतिलिटर ६ रुपये कमी दर देतो. शेट्टी यांचा दूध संघ सक्षम आहे तर त्यांनी एप्रिल २०२२ ते मार्च २३ या कालावधीत संकलित दुधाला अतिरिक्त ५ रुपये द्यावेत. तर एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या काळात गाय व म्हैस दुधाला पहिली उचल १० रुपये प्रति लिटर दर दिला तर मी लोकसभाच काय कोणतेही निवडणूक लढवणार नाही, असे प्रत्युत्तर राहुल आवाडे यांनी दिले आहे.