कोरोची (ता. हातकणंगले) येथे सुरू असलेला बनावट देशी-विदेशी मद्याची निर्मिती करणारा कारखाना कोल्हापुरातरील  राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला. या कारवाईत सहाजणांना अटक करण्यात आली असून २ दुचाकी वाहनांसह विविध ब्रॅण्डच्या मद्याचे ३४६ बॉक्ससह सुमारे ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध गुटखा निर्मिती कारखान्यापाठोपाठ आता गोवा, हुबळीनंतर इचलकरंजी मेड दारूचा कारखाना सापडल्याने शहर व परिसरात खळबळ माजली आहे. त्यामुळे येथील उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशयाची सुई रोखली गेली आहे.
या प्रकरणी संजय धोंडीराम माने या मुख्य सूत्रधारासह जगदीश आप्पासो केसरकर (वय ४०, रा. नांगनूर, ता. चिकोडी), श्रीनिवास मुन्नीस्वामी आप्पा (वय ४२, रा. मोहाली, किंगेरी), नागराज नारायण आप्पा (वय ५१, रा. बेंगलोर), टी. राजगोपाल (वय ४०, रा. तामिळनाडू), मारुती भरु माने (रा. गायकवाडी, ता. चिकोडी) यांना अटक करण्यात आली असून त्यांना रविवारी न्यायालयाने ३० डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
३१ डिसेंबरच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात कर्नाटक-महाराष्ट्रातून बनावट मद्याची तस्करी होण्याची शक्यता असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासणी सुरू आहे.  यातच करवीर तालुक्यातील कणेरीवाडी येथे इंडिका मान्झा या गाडीतून मद्याचे बॉक्स घेऊन जात असताना संजय धोंडिराम माने याला अटक केली. त्यावेळी गाडीत बॅगपायपर व्हिस्कीच्या १० बॉक्ससह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याकडे मिळालेल्या माहितीनुसार कोरोची येथे बारमध्येच ही बनावट दारू तयार करत असल्याची कबुली दिली. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय पाटील, पोलीस निरीक्षक राजाराम खोत यांच्या पथकाने कोरोची येथील माने यांच्या कारखान्यावर धाड मारली. त्यावेळी माने खानावळीच्या पिछाडीस असलेल्या शेडमध्ये बनावट मद्य तयार करण्यात येत असल्याचे आढळून आले. तेथे पाचजणांना रंगेहाथ पकडण्यात आले. घटनास्थळी केलेल्या कारवाईत मद्य निर्मितीसाठी लागणारे स्पिरीट, बॉटिलग मशिन, रिकाम्या बाटल्या, स्पिरीट, कॅरेमल, विविध ब्रॅण्डच्या कंपन्यांची महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातील लेबले व बुच्चे तसेच ब्लेंडर स्प्राईट, ओल्ड ट्रव्हल व्हिस्की, हायवर्डस, बॅगपायकर व्हिस्की असे १८० व ७५० मिलीच्या तयार मद्याचे ३४६ बॉक्स जप्त करण्यात आले. तसेच विविध प्रकारचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर सदरचे बनावट मद्य विक्रीसाठी घेऊन जात असताना कसबा बावडा येथे मारुती भरु माने याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मद्याचे १० बॉक्स व इंडिका गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ६ जणांना अटक करण्यात आली असून ४१ लाख ४४ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गत पंधरा दिवसांपूर्वीच जगदीश, श्रीनिवास व नागराज यांनी बेंगलोर येथून बनावट मद्य निर्मितीची मशिनरी आणली होती. हे तिघेजण मिळूनच बनावट मद्य तयार करीत होते. तर या मद्याची महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्रप्रदेशात विक्री केली जात होती. त्यासाठी मोठे रॅकेटही उभे केले असल्याची समजते. तर शहरालगतच बनावट मद्याचा कारखाना सुरू असल्याची साधी कुणकुणही येथील उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलिसांना कशी लागली नाही याबद्दल चच्रेला ऊत आला असून कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा