उन्हाचा तडाखा वाढला असताना रविवारी सायंकाळी जिल्ह्यात गारांसह पावसाने हजेरी लावली. उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळाला. मान टाकू लागलेल्या पिकांमध्ये जीव आला. पावसाचा वेग जिथे अधिक होता तेथे जलसंचय वाढण्यास मदत झाली.
गतवर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाला होता. त्याचे परिणाम जिल्ह्यात दिसू लागले असून अनेक शहर, गावांमध्ये पाणी-बाणी निर्माण झाली आहे. शिमगोत्सव संपल्यानंतर उन्हाचा तडाखा आणखीनच वाढला आहे. उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले असताना रविवारी सायंकाळी जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात गारांसह पाऊस पडला. गडिहग्लज, आजरा, कागल या तालुक्यात मोठय़ाप्रमाणात पाऊस पडला. जरळी, नुल या भागामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.
नदीच्या पाण्याची उपासबंदी सुरू असल्याने पिकांना पाणी पुरवठा कसा करायचा याचा पेच शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. पण आजच्या पावसामुळे मान टाकू लागलेल्या पिकांमध्ये उभारी आली. नाले, ओढे यांच्यामध्ये पाणी साचून राहिल्याने पाणी टंचाई जाणवणाऱ्या भागाला हा पाऊस उपयुक्त ठरला.