लोकसत्ता प्रतिनिधी
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. ४३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. ग्रामीण भागात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. ठप्प झालेली शेतीची कामे गतीने होत आहेत. पंचगंगा पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. सायंकाळी चार वाजता पाणी पातळी २५ फुट होती. एकूण ४३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
आणखी वाचा-कोल्हापूर: रांगणा किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांची सुटका; आपत्ती व्यवस्थापनाची निष्क्रियता
वृक्ष कोसळले, रस्ता बंद
शाहुवाडी तालुक्यात वारुळ गावाजवळ तर गगनबावडा तालुक्यात साळवन पुलावर झाड पडले होते यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पडलेली झाडे काढण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. पिसात्री येथील जांभळी नदी पुलावर ४ फुट पाणी असलेने काळजवडे पोंबरे पडसाली रस्ता बंद करण्यात आला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने पाण्यात शिरण्याचा धाडस करू नये,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
कोल्हापुरात नियोजनाचा गोंधळ
कोल्हापूरात आज पावसाचा जोर वाढला. शहर जलमय झाले. वरून पावसाच्या धारा पण पिण्याच्या पाण्याची ओरड कायम हि स्थिती कायम राहिली. अशातच अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत राहिल्याने कोल्हापूर महापालिकेचा नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. राहिले. जयंती नाल्यासह काही ठिकाणी हे चित्र प्रकर्षाने दिसत होते. याबाबत प्रजासत्ताक सेवा संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पुणे आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. पाऊस- पाण्यामुळे नाल्यातून काढलेला कचरा पुन्हा प्रवाहात मिसळून प्रदूषण वाढण्याची भीती व्यक्त करून तो सत्वर दूर करण्याची मागणी केली आहे.