कोल्हापूर

गेले तीन दिवस कोसळणार्‍या पावसाने आज उसंत घेतली. कोल्हापूर शहरात आज पावसाची उघडीप होती. पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असला तरी त्याचाही वेग कमी झाला आहे. राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडल्याने आज पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदी अजूनही इशारा पातळीवरून वाहत आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने प्रशासनाने निश्वास सोडला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. संतधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. राधानगरी व कळम्मावाडी या दोन्ही मोठ्या धरणातून विसर्ग वाढविण्यात आला होता. काल राधानगरी धरणाचे ५ दरवाजे उघडण्यात आले होते. विसर्ग वाढल्याने आणि जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीने काल सायंकाळी सात वाजता ३९ फूट ही इशारा पातळी ओलांडली होती. आज सकाळी पंचगंगा नदीची पाणीपातळी ४० फूट होती, तर मंगळवारी सायंकाळी पाच वाजता पाणी पातळी ४१ फूट इतकी होती.

पावसाचा उतार पडला असल्यामुळे पाण्याखाली असणाऱ्या बंधाऱ्यांची संख्याही दहाने कमी झाली आहे. काल ९५ बंधारे पाण्याखाली होते तर आज ही संख्या ८५ झाली आहे. पावसाचा वेग वाढल्याने आणि पाणीपातळी वाढू लागल्याने चिखली गावातील सुमारे दोन हजार लोकांचे स्थलांतर केले होते. आता पाऊस थांबल्यामुळे प्रशासनानेही विश्वास टाकला आहे.