नद्यांच्या पाण्यामुळे पूरस्थिती कायम

कोल्हापूर जिल्ह्य़ात गुरूवारी पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती मात्र कायम आहे. जिल्ह्य़ातील १३ नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. राधानगरी धरणाचा आता एकच दरवाजा उघडला असून, तेथून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याचा फुगवटा वाढू लागला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ४ फुटाने वाढली आहे. नदी इशारा पातळीच्या दिशेने धाऊ लागली असून, ४२ फुटाने वाहू लागल्यानंतर शिवाजी पुलावरून होणारी रत्नागिरीकडची वाहतूक बंद केली जाणार आहे. गुरूवारी दिवसभरात आणखी १० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. एकूण ५० बंधारे पाण्याखाली बुडाले आहेत. ७ राज्य मार्ग तर ९ जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

गेले चार दिवस कोल्हापूर जिल्ह्णाला पावसाने झोडपून काढले होते. गुरूवारी मात्र पावसाचा वेग कमी होता. मात्र पश्चिमेकडील डोंगराळ, पाणलोट क्षेत्रात मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. यामुळे जिल्ह्णातील धरणांच्या पाणीसाठय़ात आणखी वाढ  होत आहे.

 

उजनी धरणातील पाणीसाठा वाढू लागला

प्रतिनिधी, सोलापूर ; उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा दमदार पाऊस पडत असल्यामुळे पुणे जिल्ह्य़ातून भीमा नदीत प्रचंड प्रमाणात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाण्याचा साठा वेगाने वाढत आहे. गुरुवारी सायंकाळी सहापर्यंत धरणातील पाणीसाठा वजा २१ टक्क्य़ांपर्यंत होता. सायंकाळपर्यंत सुमारे एक लाख क्युसेक विसर्गाने धरणात पाणी मिसळत होते. दुसरीकडे सातारा जिल्ह्य़ात पडत असलेल्या पावसामुळे नीरा नदीत सोडलेले पाणी भीमा नदीत येत आहे.

या पाश्र्वभूमीवर, पंढरपूरच्या चंद्रभागा परिसरात पुराचा इशारा देण्यात आला आहे. गुरूवारी सायंकाळी उजनी धरणात एकूण पाण्याची पातळी ४८९.२५० मीटर तर एकूण पाणीसाठा १४७९.३६ दलघमी होता. तर उपयुक्त पाणीसाठा वजा ३२३.४५ मीटर होता. उपयुक्त पाणीसाठय़ाची टक्केवारी २१.३२ इतकी होती. गेल्या २४ तासात धरणातील पाणीसाठय़ात सुमारे पाच टक्के वाढ झाली आहे. काल बुधवारी सायंकाळी सहापर्यंत धरणातील पाणीसाठा वजा २६.०७ टक्के इतका होता. बंडगार्डन येथून एकूण ११७ टीएमसी क्षमतेचे उजनी धरण सलग दोन वर्षे दुष्काळामुळे जवळपास कोरडे राहिले आहे. परंतु यंदा सोलापूर जिल्ह्य़ात पुरेसा पाऊस नसला तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विशेषत: पुणे जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस पडत राहिल्याने तेथील पाण्याचा लाभ उजनी धरणाला होत आहे. त्याच जोरावर वजा ५४ टक्क्य़ांवरून वजा २१ टक्क्य़ांपर्यंत धरणाने मजल गाठली आहे.

Story img Loader