गेला आठवडाभर धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने शनिवारी विश्रांती घेतली. पावसाचे दर्शन झाले नसले तरी धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीमध्ये काहीशी वाढ होतच आहे. मात्र पुराचा धोका असल्याचे जाणवत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. राधानगरी धरणातील सर्व सात दरवाजे उघडण्यात आले असून, चांदोली धरणातूनही १२ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे.
तीन आठवडय़ांच्या विश्रांतीनंतर सोमवारपासून पावसाने पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढले. आठवडाभर कोसळणाऱ्या पावसाने शनिवारी उसंत घेतली. पावसाचा जोर मंदावल्याने धरण, नद्या येथे वाढणारी पाणीपातळी स्थिरावली असून आता ती कमी होईल असे प्रशासन सांगत आहे. काल राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले होते.
तर आज पहाटे साडेपाच वाजता सर्व सातही दरवाजे उघडण्यात आले आहेत. येथून प्रतिसेकंद १२ हजार २०० क्युसेक विसर्ग होऊ लागला आहे. चांदोली या मोठय़ा धरणातून पाण्याचा प्रतिसेकंद १२ हजार विसर्ग सुरू आहे. या धरणाचे पाणी पंचगंगा व कृष्णा नदीमध्ये मिसळत असल्याने या नद्यांची पाणीपातळी स्थिर आहे.
पन्हाळा येथे तीन दरवाजा येथून खाली येणाऱ्या संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन फूट खोल एक फूट रुंद व २५ फूट लांब रस्ता खचला आहे.
या मार्गावरून सहसा वाहतूक होत नाही. महाविद्यालयाचे विद्यार्थी व काही ग्रामस्थ या रस्त्याचा वापर करीत असले तरी अतिवृष्टीमुळे रस्ता खचल्याने तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तर कळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पाणीपातळी वाढल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे.

Story img Loader