इचलकरंजी नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने गुरुवारी काँग्रेस पक्षाला आणखी एक सत्तास्थान गमवावे लागले. मंडळातील फाटाफुटीच्या राजकारणामुळे विरोधी शहर विकास आघाडीचे राजू हणबर यांची सभापतिपदी वर्णी लागली आहे. त्यांनी काँग्रेसचे अमरजित जाधव यांचा ८ विरुध्द ५ मतांनी पराभव केला. या निमित्ताने शिक्षण मंडळावर शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादीतील कारंडे गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले असून आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी हीच आघाडी एकत्रित राहण्याचे संकेत राजकीय वर्तुळात मिळू लागले आहेत.
इचलकरंजी नगरपालिका शिक्षण मंडळाचे सभापती तौफिक मुजावर यांनी राजीनामा दिल्याने प्रभारी सभापती म्हणून नितीन कोकणे हे काम पहात होते. शिक्षणाधिका-यांनी जाहीर केल्या प्रमाणे आज सभापती निवडण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. सभेला शहर विकास आघाडीचे सदस्य भगवे फेटे तर काँग्रेस पक्षाचे सदस्य स्कार्फ घालून सभागृहात दाखल झाले. आमदार हाळवणकर समर्थक राजू हणबर तर काँग्रेसच्या वतीने अमरजित जाधव यांनी सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला. हात वर करून झालेल्या या निवडणुकीत हणबर यांना काँग्रेसचे रमेश कांबळे आणि गट शिक्षण अधिकारी भास्कर बाबर यांच्यासह ८ तर जाधव यांना ५ मतं मिळाली. त्यामुळं हणबर यांची सभापतिपदी निवड झाल्याचं जाहीर करण्यात आले.

Story img Loader