आत्मक्लेश यात्रेस शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून मोठी मदत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आत्मक्लेश यात्रेच्या निमित्ताने पुणे-मुंबई मार्गाची वाट खासदार राजू शेट्टी तुडवत चालले असताना या निमित्ताने काही नव्या राजकीय वाटाही निर्माण होताना दिसत आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी शेट्टी यांनी सरकारवर टीकास्त्र सुरू केले असताना त्यांचे जीवश्च-कंठश्च मित्र कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे मात्र शासकीय योजनांचे गुनगाण गात मुख्यमंत्र्यांसमवेत कार्यक्रम करीत आहेत. शेट्टी यांच्या मोठय़ा आंदोलनापासून खोत यांनी प्रथमच फारकत घेतली आहे. तर याच वेळी शेट्टी यांना पाण्यात पाहणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच शिवसेनेकडून सहानुभूतीचा स्वर उमटत आहेत. हे पाहता शेट्टी यांच्या राजकीय प्रवासाची नवी वाट यातून निर्माण होण्याची शक्यता आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी भाजप-शिवसेना यांच्या महाआघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पक्षाला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत यशाने हुलकावणी दिली. तरीही पुढे भाजपने सदाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. दरम्यान, शेट्टी व खोत यांच्यात काही ना काही कारणाने बिनसत राहिले.

गेल्या वर्षभरात शेट्टी यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात केंद्र व राज्य शासन अपयशी ठरल्याचे आरोप करीत संघर्षांचा आवाज बुलंद करण्यास सुरुवात केली आहे. त्यातील पुढचे आक्रमक पाऊल म्हणून त्यांनी आत्मक्लेश यात्रा सुरू केली आहे.

सदाभाऊ प्रथमच आंदोलनापासून अलग

खासदार शेट्टी यांच्या आजवरच्या प्रत्येक आंदोलनात सदाभाऊ खोत यांनी खांद्याला खांदा लावून सोबत केली. कोल्हापुरातील शेतकरी मोर्चावेळी ते एकत्र आले पण नि:शब्द राहिले. मात्र त्यानंतरच्या काळात दोघांची रास जुळत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे.

आत्मक्लेश यात्रेसाठी शेट्टी यांनी जोर लावून राज्यातील संघटनेचे पदाधिकारी, कार्यकत्रे यांनी सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न केले. त्यांचा सहभागही दिसून आला. पण त्याला अपवाद राहिले ते एकमेव सदाभाऊ खोत.

शेट्टी आत्मक्लेश यात्रेची वाट तुडवत शासनावर टीकास्त्र सोडत असताना खोत हे मात्र शिवारात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत शासनाच्या योजनांचे गुणगान गायले. सोमवारी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत एकाच मंचावर येत भाजपशी जवळीक अधिक प्रिय असल्याचे दाखवून दिले. यातून शेट्टी व खोत या मित्रांच्या राजकीय वाटा वेगळ्या होत असल्याचे अधिकच ठळकपणे समोर आले आहे.

शेट्टींशी मत्रीसाठी नवे हात पुढे

शेट्टी-खोत यांच्या दुरावा निर्माण होत असताना शेट्टी यांच्या प्रति सहानुभूती दर्शवीत काही मत्रीचे नवे हात पुढे येत असल्याचेही दिसत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आत्मक्लेश यात्रेला पाठबळ दर्शवीत शेट्टी यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे. तर शेट्टी यांच्याशी वैर ठेवणारे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनीही शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेला केवळ पाठिंबा न दर्शविता आपल्या सहकाऱ्यांना यात्रेमध्ये पाठवून एक प्रकारे मत्रीचा हात पुढे केला आहे. तर काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या संचालक मंडळाने यंत्रमागधारकांना संघटित करून आत्मक्लेश यात्रेत सहभागी नोंदविला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जवळीक साधलेले शेट्टी-आवाडे यांची राजकीय मत्री या निमित्ताने आणखी घट्ट होताना दिसत आहे. तर शिवसेनेचे खासदार-आमदार, मनसेचे आमदार, संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष, काही डाव्या चळवळीचे प्रमुख यांनीही यात्रेत सहभाग नोंदविला आहे. यातून शेट्टी हे भाजपपासून दूर जात असल्याचे आणि याच वेळी भाजपशी संघर्ष करणारे अन्य पक्ष मात्र शेट्टी यांच्याशी जवळीक साधत असल्याचे दिसत आहे.