कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशन काळात विधानभवनात घेतलेल्या बैठकीत एक महिन्याच्या आत इचलकरंजीच्या दूधगंगा नळ पाणी योजनेचा अहवाल मागवून पाणीप्रश्न निकाली लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा करून अहवाल मागविण्यात चालढकल करत आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी समाजवादी प्रबोधनी येथील बैठकीत केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकनंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार असून त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही येणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला राजू शेट्टी यांनी इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांवर टीकेची तोफ डागली आहे.

हेही वाचा – मागील विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातील शिवसेनेचे उमेदवार पाडण्यात चंद्रकांत पाटलांचा हात; भाजपच्या माजी नगरसेवकाचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री निर्णय का घेत नाहीत?

शेट्टी म्हणाले, इचलकरंजी शहराला शुद्ध व मुबलक पाणी देणे ही सरकारची जबाबदारी आहे. शासनाने खेडी व शहरे असा मतभेद करून जबाबदारी झटकत आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात घेतलेल्या बैठकीवेळी सुळकूड योजनेतून देण्यात येणारे पाणी हे इचलकरंजी शहरास उपलब्ध असून शासनाच्या धोरणानुसार पहिल्यांदा पिण्यास, शेतीस व नंतर उद्योगधंद्यास पाणी देणे ही शासनाची जबाबदारी आहे. विधानभवनातील बैठक होवून ५५ दिवस झाले. अजूनही मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेण्यास तयार नाहीत.

शासनाची भूमिका संशयास्पद

मुख्यमंत्री या बैठकीनंतर चार वेळा कोल्हापुरात आले मात्र इचलकरंजी पाणीप्रश्नावर बोलण्यास तयार नाहीत. आजही सरकारच्या या भूमिकेवर संशय येत असून लोकसभा निवडणूक होईपर्यंत चालढकल करण्याचा डाव दिसत आहे.

पाण्यासाठी माझा राजकीय बळी

इचलकरंजी शहराला शुद्ध व मुबलक पाणी मिळण्यासाठी राजकारणविरहीत जन आंदोलन उभे करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना पाणी कमी पडणार नाही याची हमी दिल्यास शेतकरी विरोध करणार नाही. मात्र याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये उदासिनता आहे. मी याआधी प्रयत्न करून शेतकरी व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. पण राजकारणामध्ये माझा बळी घेण्यासाठी माझ्याबद्दल गैरसमज पसरविण्यात आले. यावेळी समाजवादी प्रबोधनीचे प्रसाद कुलकर्णी, अभिजीत पटवा, राजू आरगे, अमित बियाणी, घनशाम भुथडा, रूपाली माळी, मीना कासार, डॉ. सुप्रिया माने यांच्यासह इचलकरंजी शहरातील पदाधिकारी ऊपस्थित होते.

हेही वाचा – कोल्हापूर : सत्तेत न येणाऱ्याच्याच फुकट देण्याच्या घोषणा – सुरेश हाळवणकर

मंत्रालयातील बैठकीत काय ठरले होते?

इचलकरंजी शहराला पिण्याचे स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्यासाठी सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात तज्ञांची समिती नेमून एक महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ मार्च रोजी मुंबई येथील बैठकीत दिले होते. त्याचबरोबर बैठकीत चर्चेदरम्यान उपस्थित अन्य पर्यायामधून पाणी इचलकरंजीला देता येईल काय? याबाबत देखील या समितीने अभ्यास करावा, असे सांगत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा कोणताही अडथळा याच्या कार्यवाहीसाठी येणार नाही असा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला होता.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shetty criticism of cm eknath shinde over the stalling of ichalkaranji dudhganga tap water scheme ssb