कोल्हापूर : गुन्हे दाखल झालेल्या ऊस तोडणी मुकादमांवर कारवाई बाबत लवकरच गृह विभागाची बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याशी बोलताना दिले. गेल्या वर्षभरामध्ये राज्यात सुमारे २ हजारहून अधिक ऊस वाहतूकदारांच्या तक्रारीवरून आर्थिक फसवणूक केलेल्या ऊस तोडणी मुकादमांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत.
यासंदर्भात राज्य शासनाने बैठक आयोजित करून वसुलीसंदर्भात कार्यवाही करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मंत्रालयात वाहतूकदार शिष्टमंडळासोबत भेट घेऊन केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त आश्वासन दिल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
राज्यातील ऊस तोडणी मुकादमावर गुन्हे दाखल होवूनही पोलीस यंत्रणेकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही. राज्यातील काही बड्या नेत्यांच्या वरदहस्तामुळे फसवणूक केलेले मुकादम बिनबोभाट फिरत आहेत, असा आरोप करून शेट्टी यांनी याबाबतचे गुन्हे निपटारा होण्यासाठी कालहरण होत असल्याने बँका, पतसंस्थांच्या मुद्दल, व्याजाचा भुर्दंड बसून उस वाहतूकदार आर्थिक अडचणीत आल्याचा मुद्दा चर्चेवेळी मांडला. संदीप राजोबा, राजू पाटील, रावसाहेब अबदान, दादा पाटील, विनोद पाटील, तानाजी पाटील यांचेसह वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.