कोल्हापूर : प्रामाणिकपणे काम करता तर उधळपट्टी कशी होते याचे उत्तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी द्यायला हवे. ‘अबकी बार किसान सरकार’ असे म्हणत आहात तर मग शेकडो वाहनांचा ताफा फिरवण्यासाठी तुमच्याकडे पैसा कोठून आला, अशी विचारणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंगळवारी केली. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
दहा वर्षांपूर्वी सबका साथ सबका विकास म्हणत गुजरात मॉडेल समोर आणून फसवणूक केली. केंद्र सरकारच्या कारभाराने सर्वांचा विकास व्हायचे राहिले बाजूला उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. हे पाहता पुन्हा कोणत्याही पॅटर्नमुळे फसवणूक होणार नाही याची खात्री करणे गरजेचे आहे, असे म्हणत शेट्टी यांनी तेलंगणा पॅटर्नबाबत शंका उपस्थित केली.
मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली
के. चंद्रशेखर राव हे माझे जुने मित्र आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच राज्य आणायचे असेल तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तुम्हाला पुढे करू, असे ते म्हणाले होते. तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा; केंद्रीय कोर कमिटीत देखील तुम्हाला सभासद करू, अशी ऑफर त्यांनी दिली होती. मला कोणत्याही पक्षात जायचे नव्हते. पक्षीय राजकारणात आमची आधीच फसवणूक झाली आहे. पुन्हा कोणत्या पक्षात जाणार नसल्याने त्यांना नकार दिला, असेही शेट्टी म्हणाले.