कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील प्रति टन ४०० रुपये मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेला आज शिरोळ तालुक्यातून सुरुवात झाली. चारशे रुपये मिळाल्याशिवाय कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत, असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.

गेल्या ऊस गळीत हंगामात साखर कारखान्यांना इथेनॉल व साखरेपासून ज्यादा उत्पन्न मिळाले आहे. त्याचा शेतकऱ्यांना वाटा दिला पाहिजे, अशी स्वाभिमानीची भूमिका आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांना गेल्या आठवड्यात निवेदन देऊन प्रति टन चारशे रुपये अधिक मिळावेत, अशी मागणी केली होती. तथापि जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत साखर कारखानदारांनी अधिकची रक्कम देणे शक्य नाही. कायद्यानुसार एफआरपी दिलेली आहे, असे म्हणत शेतकरी संघटनांची मागणी फेटाळून लावली आहे.

हेही वाचा – आम्हाला रक्ताचे नव्हे तर दूधगंगेच्या पाण्याचे पाट वाहायचे आहेत; आमदार प्रकाश आवाडे यांचा हसन मुश्रीफ यांना टोला

या पार्श्वभूमीवर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. यासाठी आजपासून आक्रोश पदयात्रा काढली जाणार आहे. ५२२ किलोमीटर अंतराच्या पदेयात्रेचा समारोप २२ दिवसांनंतर जयसिंगपूर येथे ऊस परिषदेमध्ये होणार आहे. तोपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम संघटनेच्या वतीने केले जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

उतारा चोरी उघडकीस आणणार

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वाभिमानीने सीए पाठवून साखर कारखान्याची आर्थिक पाहणी करावी, असे राजू शेट्टी यांना उद्देशून म्हटले होते. त्यावर शेट्टी यांनी आमचे सीए साखर कारखान्यात जाऊन आर्थिक पाहणी तर करतीलच पण यापुढे जाऊन कारखान्यातील उतारा तसेच वजन काट्यातील चोरी हे प्रकारही उघडकीस आणतील, असे प्रतिआव्हान दिले आहे.

हेही वाचा – अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी विजयादशमी १०० कोटीचा निधी मिळणार; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

पदयात्रेला जोरदार प्रतिसाद

आज शिरोळ येथील दत्त कारखान्यापासून पदयात्रेला सुरुवात झाली. प्रारंभी फुलांची उधळण करीत राजू शेट्टी यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर ढोल ताशाच्या गजरात पदयात्रेला उत्साही वातावरणात सुरुवात झाली.

बच्चू कडू – शेट्टी एकत्रित

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची सांगली येथे भेट घेतली. शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेस पाठिंबा व्यक्त केला. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज तीव्र करण्यासाठी कडू यांनी शेट्टींना आसूड भेट दिला.

Story img Loader