कोल्हापूर : मणिपूरसहित देशातील इतर ठिकाणी महिलांच्यावर अत्याचार करणारे मोकाट सुटलेले असताना एक जबाबदार नागरीक या नात्याने प्रायश्चित म्हणून माजी खासदार राजू शेट्टी यांनी आजपासून पासून पुढील ७२ तास अन्नत्याग आंदोलनाला इचलकरंजी येथे सुरुवात केली. मुसळधार पाऊस पडत असतानाही त्यांच्या आंदोलनाला नागरिकांनी उपस्थिती लावून पाठिंबा दिला.
मणिपूर मध्ये मानवी क्रौयाची परिसीमा झाली आहे. जवानाच्या पत्नीवरही अत्याचार झाल्याची चित्रफित पुढे आल्याने संतापाची लाट उसळली आहे. हा संदर्भ देवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देशभरात महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याने इचलकरंजी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ तीन दिवस अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे,असे ट्विट त्यांनी केले होते.
हेही वाचा >>> नामचीन गुंड सच्या टारझनचा खून
त्यानुसार आज सकाळी ११ वाजता राजू शेट्टी यांनी ७२ तास अन्नत्याग सत्याग्रहास प्रारंभ केला.पहिल्या दिवशी त्यांच्या सोबत महंमद हुसेन मुजावर, विश्वास बालिघाटे, पुरंदर पाटील, राजू निर्मळे आदी चक्री उपोषण मध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे शहराध्यक्ष विकास चौगुले, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बसगोंड बिराजदार, हेमंत वनकुंद्रे, सतीश मगदूम, अण्णासाहेब शहापूरे, जयकुमार कोले,सचिन शिंदे, अविनाश कोरे ,बाळासाहेब पाटील, विद्याधर पाटील, निवृत्ती शिरगुरे यांच्यासह शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.