कोल्हापूर : उद्योगपती अदानी उद्योग समूहाच्या हितासाठी पाटगाव धरणातून पाणी कोकणात नेण्यास आमचा प्रखर विरोध आहे. केंद्र सरकारने हिटलरशाही पध्दतीने भविष्यातील संकटांचा विचार न करता याची अमलबजावणी करण्याचा निर्णय घेणार असेल तर हा प्रकल्प आम्ही जनआंदोलन उभे करून हाणून पाडू,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्र सरकारच्या वरदहस्ताने अदानी उद्योग समूहाने कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगांव धरणातून पाणी घेऊन ८३४७ कोटीचा २१०० मेगावॅटचा वीजनिर्मीती प्रकल्प उभारण्याच्या  हालचाली गतिमान केल्या आहेत. येत्या २ अडीच वर्षांत शीघ्र गतीने प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. पाटगाव धरणाचे पाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामार्गे समुद्राकडे वळवल्याने भुदरगड,कागल,शिरोळ सह कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी कमी मिळणार आहे.  याशिवाय  कराराप्रमाणे कर्नाटकला पाणी देण्यासाठी काळम्मावाडी व चांदोली धरणातून जादा पाणी द्यावे लागणार आहे. यामुळे राज्य सरकारने तातडीने बैठकीचे आयोजन करून सर्वपक्षीय कृती समितीसमोर शासनाने आपली भुमिका स्पष्ट करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदनाद्वारे केली. 

हेही वाचा >>> कोल्हापूर : जिल्हाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर मुरलीधर जाधवांना अश्रू अनावर; सुषमा अंधारे अन् ‘या’ नेत्यावर केला आरोप

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यासहित म्हैशाळ योजनेवर अवलूंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फटका बसणार आहे. केंद्र सरकारने अदानी उद्योग समुहाचे हित डोळ्यासमोर ठेऊन घेतलेल्या या निर्णयामुळे सांगली -कोल्हापूर सह सीमाभागातील शेजाऱ्यांना फटका बसणार आहे. एकीकडे इचलकरंजी शहरातील जनता पिण्याच्या थेंब थेंब पाण्यासाठी तडफडत असताना केंद्र सरकारने वास्तविक पाहता या धरणातून पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी व उद्योगासाठी जे पाणी आरक्षित करण्यात आलेले आहे. तसेच पुढील तीस वर्षाचे पाणी वाटप नियोजन या सर्व गोष्टींचा जलसंपदा अथवा राज्य सरकारकडून अभिप्राय न घेता अदानीच्या हितासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.

हिटलरशाही पध्दतीला विरोध

एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा संस्था शेतीच्या पाणी परवाना  मागणीसाठी गेल्या पाच- पाच वर्षापासून मंत्रालयात हेलपाटे मारत आहेत. याकडे ना महाविकास आघाडी सरकार ,ना महायुती सरकारमधील मंत्र्यांनी कार्यवाही केली. सदर प्रकल्प ज्याठिकाणी होणार आहे त्याला लागून वनविभागाचा इको सेन्सिटीव्ह झोन येतो. वनविभागाकडूनही  या प्रकल्पास नाहारकत दाखला दिला गेलेला नाही.  यामुळे तातडीने राज्य सरकारने याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज असून अशा पध्दतीने केंद्र सरकारने हिटलरशाही पध्दतीने भविष्यातील संकटांचा विचार व करता निर्णय घेणार असेल तर सदरचा प्रकल्प आम्ही जनआंदोलन उभे करून हाणून पाडणार असल्याचे सांगितले.

ठाकरे – शेट्टी भेट

पाटगाव धरणातून वीज निर्मिती करण्यासाठी अदानी उद्योग समूहाचा प्रकल्प कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या मुळावर येणार आहे . या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन छेडणार असून याला शिवसेनेने पाठबळ द्यावे,’ असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच मुंबईत मातोश्रीवर भेट घेऊन केली होती. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, अदानीच्या धारावी बळकविण्याच्या राक्षसी प्रवृत्तीविरोधात आम्ही लढतोच आहोत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कासाठी सुद्धा आम्ही तुमच्या सोबत खंबीरपणे राहू. अदानी मुद्द्यावर ठाकरे शेट्टी एकत्र येत आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shetty warning for mass agitation if water provid from dam to adani power project zws