कोल्हापूर : उसाचा गतवर्षीचा थकीत हप्ता शेतकऱ्यांना तातडीने द्यावा. साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांचे हे पैसे बुडवायचे मनात सुध्दा आणले तर त्याच बुडक्याने तुम्हाला ठोकून काढू, असा इशारा राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे दिला. कैफियत पदयात्रा सांगता कार्यक्रमात येथे सायंकाळी ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे १०० व ५० रुपयाचा दुसरा हप्ता देण्याची राज्य सरकार व साखर कारखानदार यांना सद्बुद्धी मिळावी तसेच शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावे यासाठी शाहू महाराजांचे जनकस्थळ कागल ते समाधीस्थळ कोल्हापूरपर्यंत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करून कैफियत पदयात्रा काढण्यात आली.

हेही वाचा >>>कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; शिंदे सेनेच्या झाडाझडतीत गंभीर त्रुटी निदर्शनास

आमचा संयम सुटला

 कोल्हापुरात बोलताना राजू शेट्टी म्हणाले, गतवर्षीचा थकीत हप्ता शेतकर्यांना तातडीने द्यावा. साखर कारखानदारांनी शेतकर्यांचे पैसे बुडवायचे मनात सुध्दा आणले तर त्याच बुडक्याने तुम्हाला ठोकून काढू. आमच्या सहनशिलतेचा संयम सुटलेला आहे. स्वाभिमानीच्यावतीने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये ऊस उत्पादक प्रश्नावर राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन केले होते. उसाला तीन हजार रुपयांपेक्षा अधिक दर दिलेल्या शेतकऱ्यांना १०० रुपये प्रति टन मिळावेत तसेच तीन हजारापेक्षा कमी पैसे दिलेल्याना ५० रुपये द्यावेत ही मागणी होती. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी तशी हमी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. मात्र अजूनही प्रशासन व सरकार या गोष्टीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत.

तर डोळे काढून घेवू

त्याबरोबरच पवना ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग कुणाचीही मागणी नसताना शेतक-यांच्या मुळावर उठणारा व सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो गावांना महापुराचा वेढा वाढविणारा हा महामार्ग रद्द करावा. शाहू महाराजांची जयंती साजरी करण्याचा नैतिक अधिकार आहे का याच आत्मचिंतन करावे. प्रत्येक पावला पावलावर राज्यकर्ते सामान्य जनता व शेतक-यांना फसवू व लुबाडू लागले आहेत. शक्तीपीठच्या माध्यमातून शेतक-यांच्या जमीनी कवडीमोल दराने विकण्यासाठी वाकड्या नजरेने जरी बघाल तर डोळे काढून हातात दिले जातील, असा सज्जड इशारा राज्यकर्त्यांना दिला.

शेतकरी कर्जमुकती आंदोलनराज्यात हरितक्रांती घडविणारे वसंतराव नाईक यांच्या जिल्ह्यातून १ जुलैपासून शेतकरी कर्जमुकती आंदोलनास सुरवात करणार असून राज्यभर हे आंदोलन केले जाणार आहे. 

तीस किमीची पदयात्रा

कैफियत पदयात्रेस सकाळी ९ वाजता कागलच्या गैबी चौकातून पदयात्रेस सुरवात केली. २२ किलोमीटरची ही पदयात्रा कागल -पुणे महामार्गावरून शिवाजी विद्यापीठ ,सायबर चौक , शाहू मिल , पार्वती टॅाकीज , गोकुळ हॅाटेल , व्हीनस कॅार्नर , दसरा चौक ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे समाधिस्थळ ठिकाणी सायंकाळी ५ वाजता पोहचली. यावेळी जालंधर पाटील, सावकर मादनाईक, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, राजेंद्र गड्ड्यान्नावर, अविनाश मगदूम, सचिन शिंदे, संदीप राजोबा, प्रभू भोजे, गिरीश फोंडे, संजय चौगुले, बाळासाहेब पाटील, जयकुमार कोले, शैलैश चौगुले आदी उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shetty warning to sugar millers on overdue installments kolhapur amy