१९५६ साली दसऱ्याच्याच दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात दीक्षाभूमीवर बौध्द धर्माची दीक्षा घेतल्याच्या ऐतिहासिक घटनेची स्मृती म्हणून धम्मचक्र परिवर्तनदिन गुरुवारी बौध्द धर्मियांसह आंबेडकरप्रेमी जनतेने उत्साहाने साजरा केला. या निमित्ताने शहरात धाकटा राजवाडा व थोरल्या राजवाडय़ासह विविध आंबेडकरी वस्त्यांतून हजारो स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांनी बुध्दवंदना केली. मोटारसायकलींवरून फेरी काढण्यात आली. सायंकाळी पांजरापोळ चौकातील छत्रपती शिवाजी पुतळ्यापासून प्रबुध्द भारत ग्रुप मंडळाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीचे नेतृत्व बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केले होते. पार्क चौकातील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचल्यानंतर ही मिरवणूक विसर्जित झाली. सायंकाळी समता सैनिक दलाच्या वतीने पार्क चौकात डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर समता सैनिकांनी सलामी दिली. नंतर शेजारच्या नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर समता सैनिकांनी संचलन केले.
पांजरापोळ चौकातून निघालेली धम्मचक्र परिवर्तन दिनाची मिरवणूक नवी वेसमार्गे पार्क चौकातील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ येत असताना याच रस्त्यावर विरुध्द दिशेने नवरात्रौत्सव सांगता मिरवणूक येत होती. या दोन्ही मिरवणुकांमध्ये सुसूत्रता राहण्यासाठी रस्त्याच्या दुभाजकावर लाकडी कठडे उभारण्यात आले होते. या मार्गावर दोन्ही मिरवणुकांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन
दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी शहरातील लष्कर भागातून शिस्तबध्द संचलन करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. विविध भागातून सुरू झालेले हे संचलन बुधवार पेठ, वडार गल्ली, सळईमारुती, उत्तरकसबा व अन्य भागातील मार्गावरून होत असताना मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी