मंत्रिमंडळात नाही दिला वाटा तर आगामी निवडणुकीत काढू त्याचा काटा, अशा मिस्कील काव्यात्मक शैलीत आरपीआयचे नेते खासदार रामदास आठवले यांनी करवीरनगरीत पत्रकारांशी बोलताना सत्ताधा-यांना इशारा दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आठवले येथे आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मंत्रिमंडळात स्थान देण्याबरोबरच महामंडळातही कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.
डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या संविधान बदलाच्या मुद्दय़ावर बोलताना ते म्हणाले, या बाबतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा काहीही असला आणि मोहन भागवत त्यावर काहीही बोलत असले तरी संविधान अजिबात बदलले जाणार नाही यावर माझा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृती पाहता संविधानाला धक्का पोहोचणार नाही. बहुचर्चित आरक्षण विषयावर आठवले म्हणाले, वंचित, उपेक्षित मागासवर्गीयांचे आरक्षण कायम ठेवून इतरांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. हे आरक्षण दहा लाख रुपयाच्या आत आर्थिक उत्पन्न असलेल्यांना देण्यास हरकत नाही.
न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महिलांना मंदिर व गाभा-यात प्रवेश देण्यात यावा अशी मागणी करून आठवले यांनी महालक्ष्मी मंदिर गाभारा प्रवेशावेळी तृप्ती देसाई यांना मारहाण करणा-या भाविकांवर कारवाई करण्याची मागणीही केली. राजर्षी शाहूमहाराजांच्या पुरोगामी नगरीत अशी घटना घडणे योग्य नाही. या प्रश्नावर कोणी राजकारण करू नये असा सल्लाही आठवले यांनी या वेळी दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा