इचलकरंजीतील तीनबत्ती चौक ते चंदूर ओढय़ापर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्ती मागणीसाठी रिक्षा संघटना, टेम्पोमालक संघटनांसह नागरिक व विद्यार्थ्यांनी बुधवारी रास्ता रोको केला. दरम्यान, या रस्ताकामाची दुरुस्ती उद्यापासून हाती घेण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
येथील तीनबत्ती चौक ते चंदूर ओढय़ापर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चंदूर, आभारफाटा, रुई नवीन वसाहत अशा मोठी लोकसंख्या असलेल्या परिसरासाठी इचलकरंजीशी जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्याला सातत्याने वर्दळ असते. विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी शहरात शाळेला येण्यासाठी या रस्त्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. अशा या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वारंवार पालिका प्रशासनाला कळवूनही याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे संतप्त नागरिक, विद्यार्थ्यांसह रिक्षा व टेम्पोमालक संघटनांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. सुमारे तासभर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
बांधकाम खात्याचे अभियंता सुरेश बागडे हे आंदोलनस्थळी आले. या रस्ताकामाची निविदा प्रसिद्ध झाली असून लवकरच रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू होणार आहे, अशी माहिती या वेळी बागडे यांनी दिली. या आंदोलनात परिसरात वाहतूक करणाऱ्या रिक्षा व टेम्पो वाहतूक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. तसेच या वेळी मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी-विद्यार्थिनी व नागरिकही आंदोलनात सहभागी झाले होते.

Story img Loader