कोल्हापूर : बारसू प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. रात्री उशिरा रत्नागिरी पोलिसांकडून त्यांना ही नोटीस देण्यात आली आहे. तसेच, बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मीडियामध्ये पोस्ट, चित्र अथवा व्हिडीओ प्रदर्शित करण्याबाबतही राजू शेट्टी यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारसू प्रकल्पास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलेला आहे. तरीही शासनाकडून त्याठिकाणी जबरदस्तीने जमिनी संपादित करण्याबाबत व सदर प्रकल्पाच्या जमीन गुणवत्तेबाबतच्या विविध चाचण्या घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांवर लाठीहल्ले, अश्रूधुरांचा वापर करून त्यांना सदर ठिकाणावरून हाकलून लावण्यात येत आहे. यामुळे राज्य सरकार व शेतकरी यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झालेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शेट्टी यांनी या संघर्षामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने उडी घेतली असून, त्यांच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी उपस्थित राहून सदर प्रकल्पास विरोध केलेला आहे.

हेही वाचा – कोल्हापूर : जयसिंगपूर बाजार समितीत सर्वपक्षीय सत्ताधारी आघाडीचा एकतर्फी विजय; बंडखोर भाजपा आघाडीला झटका

शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम

दरम्यान रत्नागिरी प्रशासनाने जिल्ह्यामध्ये ३१ मे अखेर राजू शेट्टी यांना जिल्हाबंदीची नोटीस लागू केली असून, यामध्ये त्यांनी सोशल मीडियावरही पोस्ट, चित्र अथवा व्हिडीओ प्रदर्शित करण्याबाबतही राजू शेट्टी यांच्यावर बंदी घातलेली आहे. अशी पोस्ट दिसल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. संतप्त झालेल्या शेट्टी यांनी अशा नोटीशींना मी भीक घालत नसून ज्या ठिकाणी शेतकरी संकटात सापडेल त्या ठिकाणी मी त्यांच्यासोबत ठामपणे ऊभा राहणार असल्याचे सांगितले आहे.

लोकशाहीच्या राज्यामध्ये मानवी हक्कावर गदा आणण्याचे काम सरकार करत असून, राज्य सरकार जनरल डायरप्रमाणे वागू लागले आहे. काही मुठभर लोकांच्या हितासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम करत असल्याची टीका शेट्टी यांनी केली आहे.

हेही वाचा – कोल्हापूर बाजार समितीत महाविकास आघाडीची सरशी; विरोधी गटालाही स्थान

शेट्टींनी कायदा सुव्यवस्था बिघडवली?

काल रात्री उशिरा अप्पर जिल्हाधिकारी यांच्यावतीने व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यावतीने रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी दाखल होवून त्यांच्या समक्ष ही नोटीस लागू केली आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये व विविध ठिकाणी हिंसक आंदोलन करून कायदा व सुव्यवस्था बिघडविल्याचे कारण दाखवित नोटीस लागू करण्यात आलेली आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratnagiri district ban on raju shetty from today ban on making statements about the barsu project ssb