लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : सध्या काम सुरू असलेल्या रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी चोकाक या गावच्या पुढे हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांच्या संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींना चौपट मोबदला दिल्याशिवाय या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करू देणार नाही, असा इशारा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिला आहे.
राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे सध्या रत्नागिरी पासून हातकणंगले तालुक्यातील चोकाकपर्यंतचे काम वेगाने पूर्ण करत आणले आहे. या पुढे चोकाकपासून अंकलीपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग बनविताना हातकणंगले तालुक्यातील काही गावांसह तमदलगेपासून अंकलीपर्यंतच्या मार्गात मोठ्या प्रमाणात बागायती शेतीचे संपादन करावे लागणार आहे.
केंद्र सरकारने हा राष्ट्रीय महामार्ग बनवताना रत्नागिरी ते चोकाकपर्यंतच्या महामार्गावरील संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींना चौपट मोबदला दिला आहे. पण या पुढच्या शेतकऱ्यांना केवळ दुप्पट मोबदला दिला जाईल, असे धोरण अवलंबले आहे. याला शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असल्याने संबंधित शेतकऱ्यांना चौपट मोबदला दिल्याखेरीज या रस्त्याचे काम करू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.