रिपब्लिकन पक्षांमध्ये ऐक्य होऊन अध्यक्षपदी प्रकाश आंबेडकर यांची निवड झाल्यास त्यांच्या हाताखाली काम करण्यास तयार आहोत, असे म्हणत खासदार रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्ष  ऐक्य होण्यासाठी खासदार व संभाव्य मंत्रिपदावर पाणी सोडण्याची तयारी करवीर नगरीत दर्शवली. इतकेच नव्हे तर ऐक्य मोहीम प्रभावीपणे राबण्यासाठी जर कोणी नेता फुटलाच तर त्यास जिल्ह्यात प्रवेश बंदी करा, असे आवाहनही त्यांनी केले.
रिपब्लिकन पक्षाच्या ‘भारत भीम’ यात्रेच्या निमित्ताने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले हे कोल्हापुरात आले होते. या वेळी दसरा चौकात झालेल्या समता महापरिषदेत ते बोलत होते. आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मी पंतप्रधान झालो असल्याचे नरेंद्र मोदी यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे देशाची लोकशाही प्रगल्भ आहे. इकडे काही मिळत नाही म्हणून तिकडे गेलो. तिकडे सुद्धा पदाचा विचार होत नसून मंत्रिपदाच्या आश्वासनावर ठेवले आहे. मला मंत्रिपदाची लालसा नाही. पण मी कुणाचा गुलाम म्हणून राहिलेलो नसल्याचे खासदार आठवले म्हणाले.

Story img Loader