वीज देयकातील स्थिर आकाराचे सरकारकडून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय उद्योगधंदे सुरू  होणार नाहीत, असा निर्णय उद्योगपतींच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १ हजार ३३४ उद्योजकांनी ऑनलाइन अर्ज केले असून त्यापैकी ६६७ जणांना परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी दिली.

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशनच्या सभागृहात दि इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन फौंड्रीमेनच्या कोल्हापूर विभागाची बैठक झाली. शासनाच्या निर्णयानुसार २० एप्रिलपासून सर्वच उद्योग सुरू करण्याचा निर्णय उद्योगपतींनी घेतला होता.  मात्र शासनाच्या जाचक अटीमुळे बैठकीत ३ मे नंतर उद्योग सुरू करण्याचा निर्णय झाला होता. दरम्यान, आज झालेल्या बैठकीत फौंड्रीमेनचे अध्यक्ष सुमित चौगुले यांनी सांगितले की, फौंड्री उद्योग जीएसटीच्या वरच्या स्लॅबमधील उद्योग आहे. सरकारला मोठय़ा प्रमाणात उत्पन्न मिळवून देणारा हा उद्योग आहे. टाळेबंदी काळातील तीन महिन्यांसाठी स्थिर आकाराला मुदतवाढ न देता तो माफ करण्यात यावा. शेजारील गुजरात राज्याने असा कर माफ केला आहे. इतरही राज्ये तसा निर्णय घेत आहेत.

चार हजारांवर कामगार हजर

आज अखेर जिल्ह्य़ात ६६७ जणांना उद्योग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ४ हजार १६६ कामगारांच्या सहायाने प्रत्यक्षात २६१ जणांनी आपले उद्योग सुरु केले आहेत, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. अजूनही कारखानदारांनी उद्योग लवकर सुरु करावेत. त्यामाध्यमातून अर्थकारणाचे चक्र फिरले पाहिजे. या संकटात कामगाराला त्याचा रोजगार मिळाला पाहिजे. उद्योजकांना जिल्हा प्रशासनाचे सहकार्य राहणार आहे, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिले.

Story img Loader